दर्याराजासमोर मच्छीमार नतमस्तक

सकाळ वृत्‍तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

पनवेल, उरण तालुक्‍यांत नारळी पौर्णिमा उत्साहात

उरण : मुसळधार पावसामुळे खवळलेल्या दर्याला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेच्या दिवशी पनवेलसह उरणमधील मच्छीमार बांधव दर्याराजासमोर नतमस्तक झाले. पनवेलसह उरणमध्ये पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढत खोल समुद्रात नारळी पौर्णिमा म्हणजेच सोन्याचा नारळ अर्पण करून हा सण उत्साहात साजरा केला. 

मासेमारीसाठी वर्षभर समुद्रात फिरणारे मच्छीमार जून महिन्यापासून माशांच्या प्रजननकाळात मासेमारी करत नाहीत; श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून समुद्राचे पूजन करतात व त्यानंतर समुद्रात होड्या घेऊन मासेमारीला सुरुवात केली जाते. द्रोणागिरी हायस्कूल; करंजा येथील विद्यार्थ्यांनी सालाबादप्रमाणे  पारंपरिक सण साजरा केला. मुलांनी सोनेरी कागद व बांबूच्या चिपांचा वापर करून मोठा असा सोनेरी नारळ तयार केला होता. सजवलेल्या गाडीमध्ये तो नारळ मिरवणुकीने समुद्रकीनारी नेला व तिथे पूजा करून खऱ्या श्रीफळासोबत होडीने खोल समुद्रात नेऊन अर्पण केला.  

नारळी पौर्णिमेच्या या कार्यक्रमाला विधान परिषद आमदार रमेश पाटील, एस. एस. इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष मेघनाथ तांडेल, करंजा मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र कोळी, डॉ. प्रियांका कोळी, करंजा येथील उद्योगपती रवींद्र बुरुडे, चाणजेच्या सरपंच हिना कोळी, उपसरपंच प्रदीप नाखवा, द्रोणगिरी हायस्कूलचे अध्यक्ष सीताराम नाखवा, उपाध्यक्ष के. एल. कोळी, मुख्याध्यापक ए. टी. पाटील; तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fisherman bow before the door