विजेसाठी मच्छीमार रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

विरारमधील अर्नाळ्यात चार दिवस पुरवठा बंद असल्याने रास्ता रोको 

नलासोपारा : अर्नाळा गावात गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा बंद आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लावलेले रोहित्र वारंवार खराब होत असल्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्यामुळे रविवारी (ता.21) 200 हून अधिक मच्छीमारांनी रस्त्यावर उतरून संपात व्यक्त केला.

मच्छीमार मार्केटजवळच दोन तास रास्ता रोको करून उद्रेकाला वाट मोकळी करून दिली. अखेर अर्नाळा सागरी पोलिस आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी येथे येवून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर रास्ता रोको थांबवण्यात आला. 

विरार पश्‍चिमेतील अर्नाळा गावात महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. विजेचा भार सहन होत नसल्याने येथील रोहित्र खराब होत आहेत. अर्नाळा गावात ग्राहकांना होणाऱ्या पुरवठ्याच्या क्षमतेचे रोहित्र बसवण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थ महावितरण अधिकाऱ्याकडे वारंवार करत आहेत. त्यातच गेल्या चार दिवसांपासून गावातील पूर्णच वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रविवारी  मच्छीमार स्वराज्य समितीचे अध्यक्ष राजू तांडेल यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून दोन तास रस्ता रोको केला.

 लोकांचा उद्रेक वाढत असल्याचे पाहून अर्नाळा सागरी पोलिसांनी महावितरण अधिकारी यांना बोलावून घेवून, यावर तोडगा काडण्यासाठी चर्चा घडवून आणली. पाच तासात येथील खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत होईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर रास्ता रोको थांबवण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fisherman fights for electricity in Virar near Mumbai