मच्छीमारांची बोट बुडाली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

मुंबई : करंजाहून मुरूडकडे मासेमारीसाठी जाणारी बोट कुलाबा किल्ल्यापासून काही अंतरावर बंद पडली. वाऱ्यामुळे समुद्रातील पाणी बोटीत गेल्याने बोट पाण्यात बुडाली. बोटीतील आठ खलाशांनी डिझेलचे ड्रम व बोयांच्या मदतीने वरसोली किनारा गाठला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. 

उरण तालुक्‍यातील करंजामधील नवापाडा येथील सुरेखा राजेश नाखवा यांच्या मालकीची "नमो शिवाय' नावाची बोट आहे. गुरुवारी मासेमारीला सुरुवात झाल्याने पहाटे चार वाजता खलाशी मासेमारीसाठी निघाले. चावुखादी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खोल समुद्रात 12 नॉटीकल मैलापलीकडे अचानक बोटीचे इंजिन बंद पडले. कुलाबा किल्ल्यापासून दोन किमी अंतरावर सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

वादळी वाऱ्यामुळे बोटीमध्ये समुद्रातील पाणी शिरले. त्यामुळे बोट हळूहळू बुडू लागली. बोटीतील खलाशांनी जीव वाचविण्याचा शर्तीचा प्रयत्न केला. या वेळी खलाशांनी वॉटर प्रुफ जॅकेट घालून तसेच डिझेलच्या रिकाम्या ड्रम व बोयांच्या मदतीने साडेतीन किलोमीटरचा प्रवास करीत वरसोलीमधील किनारा गाठला.

या बोटीतील खलाशी वसंत बामा पाटील, धावू गोविंद तांडेल, गजानन अर्जुन जोशी, नितीन जनार्दन ठाकूर, उमाजी बालाजी पाटील, रुपेश जनार्दन पाटील, नारायण मंगल्या कोळी, परशुराम शांताराम पाटील हे सुखरुप किनारे पोहचले. या अपघातामध्ये जीवितहानी टळली. मात्र, बोटीसह साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fisherman's boat sank