पालघरमध्ये पाऊस, भरतीमुळे मच्छिमारांचे संसार पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

सातपाटी, केळवे किनाऱ्यावरील घरांना पाऊस, भरतीचा फटका 

पालघर  ः सातपाटी व तळवे येथील समुद्रकिनारी दर वर्षी पावसाळ्यात उधाणाच्या वेळी पाऊस जास्त झाला तर प्रचंड लाटांच्या तडाख्यात समुद्राचे पाणी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड पाडून किनाऱ्यावरील घरा-घरांत घुसते सातपाटी गावात 50; तर केळवे येथे 20 घरात पाणी घुसून येथील गरीब मच्छीमारांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. आज त्यांना पुन्हा संसार मांडावा लागत आहे. 

समुद्राला आलेले उधाण; त्यातच जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा यामुळे समुद्राच्या लाटांचा तडाखा किनाऱ्यावरील घरांना बसला आहे. सातपाटीमधील 50; तर केळवेतील 20 घरांत पाणी घुसून अन्नधान्य, कपडे, पावसाळ्यात विकण्यासाठी म्हणून ठेवलेले सुकी मासळी यांचे नुकसान झाले आहे.

पावसाळ्यात काहीच कामधंदा नसल्याने ते सुकी मासळी जमा करून त्याची बाजारात विक्री करून रोजचे लागणारे अन्नधान्य आदी वस्तू आणतात; मात्र पावसाने त्यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा संसार उभा करण्यासाठी सरकारने मदत करणे आवश्‍यक आहे, अशी मागणी मच्छीमार नेते रामकृष्ण तांडेल, सातपाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अरविंद पाटील यांनी केली आहे.  

सातपाटी आणि केळवे किनाऱ्यावरील पाणी घुसलेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे तलाठी सर्कल करीत आहेत. पंचनामे झाल्यानंतर आर्थिक मदत देण्याबाबत विचार केला जाईल. 
- महेश सागर, तहसीलदार, पालघर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fishermens house damage rain and water tide in Palghar near Mumbai