महिलेच्या पोटातून निघाले पाच कोटींचे कोकेन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

ही महिला व्हेनेझुएलाची असून तिला अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे.

मुंबई : अमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी अटक केलेल्या व्हेनेझुएलाच्या 27 वर्षांच्या तरुणीच्या पोटातून जे. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी नुकत्याच कोकेनने भरलेल्या 80 कॅप्सूल बाहेर काढल्या आहेत. ही तरुणी व्हेनेझुएलाची माजी लष्करी अधिकारी आहे. डॉक्‍टरांनी पाच दिवस अथक प्रयत्न करून या कॅप्सूल बाहेर काढल्या. या कोकेनची किंमत पाच कोटी असल्याची माहिती महसूल गुप्त वार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्याने दिली.

बाल्झाबाप्तिस्ता कारेनडार्लेनी (वय 27) असे या तरुणीचे नाव असून, ती साओ पावलो येथून मुंबईत आली होती. इथिओपियन एअरलाईन्सच्या विमानातून आल्यानंतर शुक्रवारी तिला ताब्यात घेण्यात आले. जे.जे. रुग्णालयात तिचा एक्‍स-रे काढला असता, तिच्या पोटात संशयास्पद वस्तू असल्याचे दिसले. 9 ते 13 ऑगस्टदरम्यान डॉक्‍टरांनी तिच्या पोटातून 80 कॅप्सूल काढल्या.

या तरुणीला केवळ स्पॅनिश भाषाच येत असल्यामुळे दुभाषाच्या मदतीने तिची चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागे नायजेरियन तस्करांचा संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही तरुणी 2014 मध्ये डॉमनिक रिप्लिक येथे तस्करांच्या संपर्कात आली. त्यानंतर तस्करांनी फेब्रुवारीमध्ये तिच्याशी फेसबुक मेसेंजरद्वारे संपर्क साधला. ती त्यांना साओ पावलो येथे भेटल्यानंतर तिच्याकडे कोकेन देण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर तिला ब्राझीलला जाण्यास सांगितले. तेथे तिला पाच हजार अमेरिकन डॉलर मिळणार होते.

एकाच गटाचा सहभाग
 

या सर्व प्रकरणामागे एकच गट असल्याचा संशय आहे. महिनाभरात या गटाने पाठवलेले 50 कोटींहून अधिक रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, सात तस्करांना अटक करण्यात आली आहे. हवाई गुप्तचर विभाग, केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक व "डीआरआय'ने त्यांच्या तीन हस्तकांनाही अटक केली आहे. तिघांच्याही पोटातून कोकेन हस्तगत करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five crore cocaine was found in the stomach of women in mumbai