लघुशंकेसाठी रस्त्याकडेला थांबलेल्या पाचजणांचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

रविवारच्या सुट्टीची मजा अलिबागच्या समुद्रकिनारी लुटून तळेगावकडे परत येत होते.

खोपोली - रविवारच्या सुट्टीची मजा अलिबागच्या समुद्रकिनारी लुटून तळेगावकडे परत येणाऱ्या पाच तरूणांवर बोरघाटात मृत्यूने घाला घातला. रस्त्याकडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या या तरुणांवर भरधाव टेम्पो पलटी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण बचावला आहे. 

हेही वाचा - सावधान कोरोना विषाणूचा मुंबईत शिरकाव

या भीषण अपघातात प्रदीप प्रकाश चोले (38), अमोल बालाजी चिलमे (30), नारायण राम गुंडाळे (28), गोविंद न्यानोबा नलवाड(26) निवृत्ती उर्फ अर्जुन राम गुंडाळे (28) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मिञ बालाजी हरिश्‍चंद्र भंडार (35) हा मात्र बचावला आहे. हे सर्वजण मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालक्‍याच्या वंजारवाडी या गावचे रहिवाशी आहेत. हे सर्वजण कामानिमित्ताने तळेगाव येथे वास्तव्यास होते. 

हेही वाचा -  एसटीच्या तोट्यात आणखी ८०२ कोटींची होणार वाढ

रविवारी (ता.1) कामाला सुट्टी असल्याने हे सर्वजण अलिबाग येथे सहलीसाठी गेले होते. अलीबागवरुन परतताना रात्री 10.30 च्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथील बोरघाटातील अंडा पॉइंट येथे हे सर्वजण रस्त्याकडेला दुचाकी उभे करून लघुशंकेसाठी थांबले. त्याचवेळी पुण्याकडून खोपोलीच्या दिशेने येणाऱ्या एक आयशर ट्रक थेट येऊन या सर्वांवर पडला. या भयानक दुर्घटनेत उभे असलेल्यांपैकी 5 जण जागीच ठार झाले तर एकजण मात्र बचावला आहे. 

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे सदस्य मदतीसाठी घटनास्थळी पोचले. त्यानंतर त्यांनी सर्व तरुणांना खोपोली नगर परिषदेच्या दवाखान्यात नेले असता त्यातील पाच जणांना तेथील डॉक्‍टरांनी मृत घोषीत केले. त्यांचे मृतदेह खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर सर्व मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकेडे सोपवण्यात आले. हे सर्व तरुण लातूर जिल्ह्यातील वंजारवाडीचे रहिवाशी असल्याने या गावावर शोककळा पसरली आहे. हे सर्व तरुण मूळ रा- वंजारवाडी ता- अहमदपूर जि. लातूर येथील असून , सध्या वराळे फाटा तळेगाव पुणे येथे नौकरी निमित्ताने वास्तव्यास होते . 

मृत्यूचा पाईंट 

मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथील बोरघाटातील अपघात झालेल्या या अंडा पॉईंटवर याआधीदेखील अनेक मोठे व भयानक अपघात झाले आहेत. त्यामुळे या पाईंटवरील वाहतूक व्यवस्थेत योग्य ते बदल करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. 

web title : Five died on the spot in road accident


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five died on the spot in road accident