विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू 

विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू 

कल्याण : खासगी विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात घडली. त्यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचाही समावेश आहे. 

चक्कीनाका परिसरातील भीमाशंकर मंदिराजवळ असलेल्या या विहिरीनजीकच्या अर्धवट बांधलेल्या नाल्यात एका कारखान्यातील रासायनिक सांडपाणी सोडले जाते. या नाल्यातील रसायनमिश्रित पाणी मिसळल्याने विहिरीत गाळ साचला होता. तो काढण्यासाठी मंदिराचे विश्‍वस्त गुणवंत गोस्वामी (50) यांनी दुपारी 2.30च्या सुमारास कमलेश यादव (35) या सफाई कर्मचाऱ्याला विहिरीत उतरवले होते. बराच वेळ झाल्यानंतरही कमलेश बाहेर न आल्याने गुणवंत यांचा मुलगा राहुल (35) विहिरीत उतरला. ते दोघेही बाहेर न आल्याने गुणवंतही विहिरीत उतरले. ते तिघेही बाहेर न आल्याने स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावले. विहिरीत उतरलेल्यांचा शोध घेण्यासाठी आत उतरलेले अनंत शेलार (50) आणि प्रमोद वाकचौरे (52) हे अग्निशमन दलाचे जवानही बुडाले. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी काठ्या, दोरी आणि आकड्याच्या साह्याने काही वेळाने पाचही मृतदेह बाहेर काढले. 
 
मृत्यू कशामुळे? 
रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे विहिरीत साठलेला विषारी वायू नाकात गेल्याने गुदमरून या पाचजणांचा मृत्यू झाला असावा, असा कयास बांधण्यात येत आहे. त्यांचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाला असावा, अशीही शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, नाल्यातील तसेच विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांच्या विच्छेदन अहवालाचीही आम्ही प्रतीक्षा करत आहोत. दोन्ही अहवाल आल्यानंतर सखोल चौकशी करून दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे अप्पर पोलिस आयुक्त प्रताप दिघागावकर यांनी सांगितले. 

या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. या घटनेत दगावलेल्या अग्निशमन दलाच्या दोन जवानांच्या कुटुंबीयांना सरकारी धोरणानुसार मदत दिली जाईल. 
- विजय पगार, उपायुक्त, कल्याण-डोंबिवली पालिका 

नजीकच्या कारखान्यातून सोडण्यात येणारे सांडपाणी या विहिरीत जात असल्याबाबत, अर्धवट अवस्थेत बांधलेला नाला तसेच सिमेंटच्या रस्त्यासंदर्भात स्थानिक नगरसेवक, नागरिकांनी पालिका, सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधले होते. गेल्या महिन्यात संबंधित अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणीही केली होती. त्यानंतर काहीही पावले उचलली न गेल्याने हा अपघात घडला. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, 
- श्रीकांत शिंदे, खासदार 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com