नालासोपारा स्फोटकांप्रकरणी पाचव्या संशयितास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

मुंबई - नालासोपारा स्फोटकांप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घाटकोपरमधील भटवाडी येथील अविनाश पवार (वय ३०) याला अटक केली. स्फोटकांप्रकरणी तो संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून सीपीयू आणि मोबाईल जप्त करण्यात आला. न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मुंबई - नालासोपारा स्फोटकांप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घाटकोपरमधील भटवाडी येथील अविनाश पवार (वय ३०) याला अटक केली. स्फोटकांप्रकरणी तो संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून सीपीयू आणि मोबाईल जप्त करण्यात आला. न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

राज्यातील विविध ठिकाणी घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना काही दिवसांपूर्वी एटीएसने अटक केली. त्या वेळी पोलिसांनी वैभव राऊत याच्यासह शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक केली. शरदच्या चौकशीतून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मारेकरी सचिन अंदुरे याला अटक झाली. तसेच, घातक शस्त्रे बनवण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी केल्याप्रकरणी श्रीकांत पांगरकरला पोलिसांनी अटक केल्यानंतर हा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश आले. कलबुर्गी हत्येप्रकरणी पोलिसांनी कर्नाटकात अमोल काळेला अटक केली. त्याच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली होती. पुरोगामी विचारवंतांच्या हत्यासत्रात यांचा सहभाग असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

चौकशीतून घाटकोपरमधील अविनाश पवारचे नाव स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. चौकशीत त्याचाही सहभाग निश्‍चित झाल्याने पोलिसांनी त्याला स्फोटकांच्या गुन्ह्यात अटक केली. आरोपीविरोधात गैरकृत्य प्रतिबंधक कायदा, स्फोटके प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पवारकडून जप्त करण्यात आलेले सीपीयू आणि मोबाईलची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. आरोपींच्या चौकशीत अविनाश त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. अविनाशने आरोपींसोबत बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे का, याबाबत एटीएस चौकशी करणार आहे.

‘शिव प्रतिष्ठान’शी संबंधित?
पवार हा माझगाव डॉक येथे कामाला आहे. तो शिव प्रतिष्ठान संघटनेशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. पवार विविध उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभागी व्हायचा. त्याचा अशा घटनांशी संबंध असल्याचे वाटत नाही. त्याला गोवण्यात आले असावे, असा दावा त्याच्या काही मित्रांनी केला.

Web Title: Five Suspected Arrested by ATS Crime