बिबट्या व सांबराच्या शिकारीबद्दल पाच अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 जानेवारी 2019

मुंबई - गोरेगाव येथील चित्रनगरीत बिबट्या आणि सांबराची शिकार दोन भाऊ आणि अन्य तिघांनी केल्याचे उघड झाले आहे. वन विभागाने या पाच जणांना अटक केली असून, त्यांनी शिकार केल्याची कबुली दिली आहे. गायब झालेली बिबट्याची नखे आणि सांबराचे शिर याबाबत मात्र अद्याप खुलासा झालेला नाही. 

मुंबई - गोरेगाव येथील चित्रनगरीत बिबट्या आणि सांबराची शिकार दोन भाऊ आणि अन्य तिघांनी केल्याचे उघड झाले आहे. वन विभागाने या पाच जणांना अटक केली असून, त्यांनी शिकार केल्याची कबुली दिली आहे. गायब झालेली बिबट्याची नखे आणि सांबराचे शिर याबाबत मात्र अद्याप खुलासा झालेला नाही. 

चित्रनगरीच्या परिसरात मंगळवारी (ता. 1) बिबट्या आणि सांबराचे सापळ्यात अडकलेले कुजलेल्या अवस्थेतीतील मृतदेह आढळले. त्यानंतर वन विभागाने खबऱ्यांना कामाला लावले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 3) राहुल हाबळे (25) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडून इंदिरा गांधी संशोधन व विकास केंद्रातील कंत्राटी सुरक्षारक्षक अनिल भोये (32) आणि गणपत दळवी (31) यांची नावे मिळाली. 

या तिघांची वेगवेगळी चौकशी केली असता, दशरथ हबाळे (32), मोहन भोये (20) यांची नावे पुढे आली. कसून चौकशी केल्यावर या पाच जणांनी शिकारीसाठी सापळे लावल्याची कबुली दिली. हे पाचही जण चित्रनगरी आणि आरे वसाहतीच्या परिसरात राहणारे आहेत. राहुल आणि दशरथ हबाळे हे भाऊ आहेत, दशरथ महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात कामाला आहे. 

या पाच जणांवर वन्यजीव अधिनियमातील कलम क्र. 9, 39, 44, 48, 48(अ) व 51 आणि भारतीय वन्य जैवविविधता अधिनियमांतर्गत (2002) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

आणखी काही जण सहभागी? 
या पाच जणांनी लावलेल्या सापळ्यांत अडकून बिबट्या आणि सांबराचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. तथापि, बिबट्याची नखे आणि सांबराचे शिर कोणी चोरले, याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे वन विभाग अधिक तपास करत आहे. मृत प्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीबाबत वन विभागाला माहिती मिळालेली नाही. त्यामुळे या शिकारीत आणखी काही जणांचा हात असावा, अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Five suspects for leopard and sambhar hunter