पुरामुळे महाड शहर भीतीच्या छायेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

महाड तालुक्‍यात सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी रुद्रावतार धारण केला आहे. त्यामुळे तोंडचे पाणी पळाले आहे. वाळण, वरंध खोऱ्यामध्ये मंगळवारी सायंकाळी मोठी पर्जन्यवृष्टी झाली. त्यातच माणगाव तालुक्‍यातील पहेल गावातही अतिपर्जन्यवृष्टी झाल्याने त्याचा मोठा परिणाम होऊन महाड शहरातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. 

महाडमध्ये पूरभय 
महाड (बातमीदार) : महाड तालुक्‍यात अतिवृष्टीने अक्षरशः थैमान घातले असून मंगळवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने शहराला चहूबाजूने पुराचा वेढा होता. हे पाणी बुधवारी सकाळी ओसरले असले, तरीही महाडकर भीतीच्या छायेत आहेत. तालुक्‍यातील सरकारी मालमत्तांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

तालुक्‍यात सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी रुद्रावतार धारण केला आहे. त्यामुळे तोंडचे पाणी पळाले आहे. वाळण, वरंध खोऱ्यामध्ये मंगळवारी सायंकाळी मोठी पर्जन्यवृष्टी झाली. त्यातच माणगाव तालुक्‍यातील पहेल गावातही अतिपर्जन्यवृष्टी झाल्याने त्याचा मोठा परिणाम होऊन महाड शहरातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. 

सतत पडणारा पाऊस आणि त्यातच बिरवाडी, नाते परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहून आलेले पाणी शहरात बघता बघता शिरले. काही तासांतच महाडमध्ये मोठा पूर आला. मंगळवारी रात्री अकरा वाजेपर्यंत संपूर्ण महाड शहराला चहूबाजूंनी पाण्याने वेढलेले होते. या पुरामध्ये बुधवारी शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. घराजवळ इमारतीखाली असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. व्यापारीवर्ग कोलमडला आहे. 

महाडप्रमाणेच बिरवाडी परिसरामध्ये पाण्याचा वेग प्रचंड होता. बिरवाडी खरवली या खूप उंच पुलावरून पाणी गेले. हे सर्व पाणी आसनपोई गावात शिरले. "एनडीआरएफ'च्या पथकाने स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्तळी स्तलांतरित केले. या ठिकाणीही काही कामगार अडकून पडलेले होते. हे सर्व कामगार रात्रभर कंपनीतच होते. सकाळी पाणी ओसरल्यानंतर ते घरी परतले. एमआयडीसीत अनेक कंपन्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दासगाव, कोळोसे आणि नाते भागातही मोठ्या प्रमाणात पूर आला होता. सावित्री नदीवर असणाऱ्या दादली पुलाचे कठडे वाहून गेल्याने हा पूल आज सकाळपासून वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. पुलावर असलेली महाड पालिकेला पाणी पुरवठा करणारी वाहिनी वाहून गेल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. वीज आणि दूरध्वनी सेवाही ठप्प आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The floods in the Mahad