esakal | मुंबईत फूल बाजाराला बहर, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
sakal

बोलून बातमी शोधा

flower

मुंबईत फूल बाजाराला बहर, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

sakal_logo
By
रजनीकांत साळवी

प्रभादेवी : कोणताही सण-उत्सव असो की कार्यक्रम, यांमध्ये फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यातही शोभिवंत फुले विशेष ‘भाव’ खातात. गणेशोत्सवात झेंडू फुलांबरोबर पिवळा गोंडा, पिवळी-पांढरी-जांभळी-दांडी शेवंती, गुलछडी, सूर्यफूल, गुलाब पाकळ्यांना अधिक मागणी असते. गेल्या वर्षी कोरोना टाळेबंदीमुळे फूल बाजार ओस पडला होता.

परंतु, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या बाजारपेठांना पुन्हा बहर आला आहे. त्यात झेंडूच्या फुलांबरोबरच शोभीवंत फुलांनाही मागणी वाढली आहे.

यंदा गणेशोत्सवानिमित्त सजावटीसाठी पर्यावरणपूरक मखर, शोभीवंत फुलांबरोबर कृत्रिम फुलांचाही पर्याय अनेकांनी निवडला आहे. त्यामुळेच बाजारात या फुलांची मागणी वाढली आहे. सजावटीसाठी लागणाऱ्या ऑर्किड, जरभरा, चायनीज गुलाब, लाल गुलाब, कार्निशियन, शेवंती, ऑर्किड मोकडा या फुलांना जास्त मागणी असल्याचे विक्रेते सांगतात. या फुलांचे दर वाढले असले तरी ग्राहकांकडून ही फुले खरेदी केली जात आहेत.

हेही वाचा: आयटी धोरणासाठी संकल्पना द्या : राज्यमंत्री सतेज पाटील

दादरच्या फूल बाजारात फुलांची आवक वाढली असून शोभीवंत फुलांकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. गेल्या वर्षी टाळेबंदीचा फटका फूल विक्रेत्यांना सहन करावा लागला; मात्र सरकारने यंदा काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्यामुळे फूल बाजारात उत्साह आहे.

सुगंधी फुलांनी घरातील वातावरण प्रफुल्लित राहते. शोभीवंत फुले चार ते पाच दिवस टिकतात आणि सजावट देखील चांगली होते. त्यामुळे आम्ही यावर्षी बाप्पाच्या सजावटीसाठी शोभीवंत फुलांचा पर्याय निवडला आहे.

- पंकज म्हात्रे, ग्राहक

इतर मखरांच्या तुलनेत शोभीवंत फुलांची आरास जास्त चांगली दिसते. वातावरणात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि सजावट देखील उठून दिसते. त्यामुळे फुले महागली असली तरी सजावटीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

- संकेत पवार, ग्राहक

हेही वाचा: मोदी सरकारकडून किरिट सोमय्यांना झेड सुरक्षा

गेल्या वर्षी टाळेबंदी असल्यामुळे सर्व बंद होते. यावर्षी निर्बंध शिथिल केल्यामुळे व्यवसाय पुन्हा सुरळित होण्यास मदत झाली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी फुलांचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत.

- रवि मांढरे, फूल विक्रेते

गेल्या वर्षी टाळेबंदीमुळे भाविक बाहेरच पडले नाहीत. परिणामी गणेशोत्सवात फुलांना मागणी कमी होती. यावर्षी निर्बंध शिथिल झाल्यामुळे मागणी वाढली आहे. त्यामुळे फुलांचे दर थोडे वाढले आहेत.

- दिनेश पुंडे, फूल विक्रेते

शोभिवंत फुलांचे दर

  • फुले सध्याचे गेल्यावर्षीचे

  • कार्निशन २०० १५० ते २००

  • ऑर्चीड ६०० ३०० ते ४००

  • जरभरा ८० ५०

  • ऑर्चीड मोकाडा ५०० ४०० ते ४५०

  • शेवंती ४०० ३०० ते ३५०

  • चायनीज गुलाब १५० १००

loading image
go to top