पक्ष्यांच्या किलबिलाटात करा उद्यानात कल्ला!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

गोराईतील एस्सेल वर्ल्ड या थीम पार्कमध्ये साकारलेल्या पक्षी उद्यानातील परदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटात आता पर्यटकांना कल्ला करता येणार आहे.

मुंबई - गोराईतील एस्सेल वर्ल्ड या थीम पार्कमध्ये साकारलेल्या पक्षी उद्यानातील परदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटात आता पर्यटकांना कल्ला करता येणार आहे. या पक्ष्यांना अंगाखाद्यांवर खेळवताही येणार आहे. येथे ५०० हून अधिक विदेशी प्रजातीचे पक्षी असून त्यांचा जन्म भारतातच झाला आहे.

गोराई येथे दीड एकरच्या जागेत मोठ्या पोलादी कुंपणात पक्ष्यांना ठेवण्यात आले आहे. त्यात पर्यटकांनाही प्रवेश करता येणार आहे.

जगभरातील साठहून अधिक प्रजातींमधील उडणारे, जमिनीवरील आणि पाण्यातील असे पाचशेहून अधिक परदेशी पक्षी या उद्यानात असतील. त्यांच्या निवाऱ्यासाठी परदेशी प्रजातीतील दीडशे, तर भारतीय प्रजातीतील ५० झाडे लावण्यात आली आहेत. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी उद्यान साकारल्याचे एस्सेल वर्ल्डचे उपाध्यक्ष आनंद लामधाडे यांनी सांगितले.

पाण्यात डुंबणाऱ्या पक्ष्यांचे छायाचित्रही पर्यटकांना घेता येणार आहे. हे परदेशी प्रजातींचे पक्षी कोलकाता, बेंगळुरु, कर्जत येथील प्रजनन केंद्रातून आणण्यात आले आहेत. दीड वर्षात ते उद्यानाशी, अधिकाऱ्यांशी समरस झाल्यानंतर आता उद्यान सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

उद्यानातील पक्षी...
आफ्रिकन ग्रे पॅरट, ब्ल्यू गोल्ड मकाव, कॉकाटील, रेनबो लोरिकिट, टौको-ट्युकन, ब्लॅक लोरी आणि वॉयलेट टुराको यांसारखे उडणारे पक्षी, कॉलिफोर्निया क्वेल, गोल्डन फीजंट आणि शहामृग यांसारखे जमिनीवरील पक्षी, तसेच ब्लॅक स्वान, अमेरिकन वूड डक आणि मॅडरिन डक यांसारखे पाणपक्षी अशा अनेक प्रजाती इथे पाहता येतील.

नव्या पिल्लांचे आगमन
दोन वर्षांत काही पक्ष्यांच्या जोड्या तयार झाल्या. त्यांनी उद्यानाला नवी पिल्लेही दिली. दक्षिण ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या कॅप बॅरोन गीज, आग्नेय आशिया खंडात आढणारे झिब्रा डव्ह (कबुतरांशी साधर्म्य असणारे पक्षी), मॅक्‍सिकोत आढणारे मॉस्को व्ही बदक, ऑस्ट्रेलियात दिसून येणारे फिंचेस या पक्ष्यांची पिल्ले आता उद्यानात बागडताना दिसतात.

Web Title: Foreign birds in Essel World Theme Park in the Gori