भिवंडीच्या माजी उपमहापौरास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

मागील आठ महिन्यांपासून फरारी असलेला कॉंग्रेसचा नगरसेवक व माजी उपमहापौर अहमद हुसैन मंगरू हुसैन सिद्दीकी याला आज अटक करण्यात आली.

भिवंडी ः मागील आठ महिन्यांपासून फरारी असलेला कॉंग्रेसचा नगरसेवक व माजी उपमहापौर अहमद हुसैन मंगरू हुसैन सिद्दीकी याला आज अटक करण्यात आली. त्यामुळे शहरातील कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते खालिद गुड्डू शेख यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचे तपासात पुढे आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने तो गेल्या आठ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत फरारी होता.

खालीद गुड्डू शेख यांनी पोलिस आरोपीस पकडण्यात हयगय करीत असल्याची तक्रार ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे बुधवारी (ता.14) पोलिस उपायुक्त आयुक्त राजकुमार शिंदे यांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी सिद्दीकीला अटक केली. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोकाटे करीत आहेत. 

हत्येसाठी दिली होती सुपारी 
जैतुनपुरा समदनगर भागात आठ महिन्यांपूर्वी दोन संशयित प्राणघातक शस्त्रे घेऊन फिरत असल्याची खबर नागरिकांनी शहर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मो. साजीद निसार अन्सारी व मो. दानिश मो. फारूख अन्सारी या दोन तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन विदेशी पिस्तूल सापडली.

त्याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता 28 जून 2018 रोजी त्यांनी मो. अलीम निजामुद्दीन सिद्दीकी ऊर्फ आलीम बक्कन सरदार याने समदनगर येथील खालीद गुड्डू शेख यांना मारण्याची 2 लाखाची सुपारी दिल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी माजी नगरसेवक आलिम बक्कन सरदार व मो. अश्‍फाक मंगरू सिद्दीकी या दोघांना अटक केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Deputy Mayor of Bhiwandi arrested