माजी महापौरांची फौज मैदानात

दीपा कदम - सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 जानेवारी 2017

शिवसेनेने जुन्या आणि नव्या उमेदवारांचा समतोल साधण्याचा प्रयत्न चालविला असून माजी महापौरांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे...

मुंबई - चार वेळा नगरसेवकपदाच्या काळात महापौरपद भूषविलेले शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य पुन्हा एकदा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयार झाले आहेत. मिलिंद वैद्य यांच्याप्रमाणेच एक नव्हे, तर तब्बल सहा माजी महापौरांना पुन्हा रिंगणात उतरवण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. वैद्य यांच्याबरोबर विशाखा राऊत, शुभा राऊळ, दत्ता दळवी, श्रद्धा जाधव आणि विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा महापालिका निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

शिवसेना-भाजपच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणात दोन्ही पक्ष आपले अधिक उमेदवार निवडून आणण्याची रणनीती आखत आहेत. नगरसेवकपदाचा दांडगा अनुभव, मतदारसंघावर हुकमी पकड आणि मतदारांमध्ये चांगली ओळख असलेल्या जवळपास सहा महापौरांना पुन्हा रिंगणात उतरवण्याची तयारी शिवसेनेने चालवली आहे. 

१९९२ पासून १९९९ पर्यंत दोन वेळा नगरसेविका असलेल्या आणि २००४ मध्ये आमदार असलेल्या माजी महापौर विशाखा राऊत यांनी महापालिका सभागृहात जुन्या आणि नवीन सदस्यांचा सहभाग असणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्‍त केले. त्या म्हणाल्या, की मुंबई महापालिकेचा आवाका इतका प्रचंड मोठा आहे की त्याची कार्यपद्धती समजून घेण्यातच नवीन नगरसेवकांची पहिली दोन-तीन वर्षे जातात. त्यामुळे सभागृहात काम करण्यासाठी पक्षालाही अनुभवी नगरसेवकांची गरज असते. मुंबईतील आमदारालाही पायाभूत सुविधांचे प्रश्‍नच सोडवावे लागतात. शिवसैनिक म्हणून त्या प्रश्‍नांवर आम्ही सातत्याने काम करत असल्याने आमच्यासाठी ते नवीन नाहीत.

चार वेळा नगरसेवकपद भूषविलेले माजी महापौर मिलिंद वैद्य म्हणाले, की कोणत्याही पदापेक्षा शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता असणे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे. पक्षाने आदेश दिला तर मात्र पुन्हा महापालिका निवडणूक लढविण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शहराच्या बदललेल्या प्रश्‍नांवर आम्ही काम करतच असल्याने पायाभूत सोई-सुविधांबाबतच्या समस्या सोडवतच असतो, असे त्यांनी सांगितले. 

महादेव देवळे इच्छुक नाहीत
२००१ ते २००५ दरम्यान महापौरपद भूषविलेले शिवसेनेचे माजी महापौर महादेव देवळे यांनी मात्र पुन्हा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले, की पुन्हा नगरसेवकपदाची निवडणूक लढविणार नसल्याचे बाळासाहेब ठाकरे यांच्या पायाशी शपथ घेऊन मी जाहीर केले होते. यंदाही विभागप्रमुखांनी मला मान देऊन पुन्हा निवडणूक लढविणार का, अशी विचारणा केली होती. शिवसेनेत अजूनही जुन्या शिवसैनिकांना आदर दिला जातो; पण नवीन उमेदवारांना संधी मिळावी, असे मला वाटते. एकदा महापौर झाल्यानंतर पुन्हा नगरसेवकपदासाठी किंवा माझ्या कुटुंबीयांपैकी कोणासाठी मला प्रयत्न करायचा नाही.

Web Title: Former Mayor election