मतदारराजा, आजचा दिवस तुझा! 

मतदारराजा, आजचा दिवस तुझा! 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई सज्ज झाली असून महिलांसाठी विशेष सखी केंद्र, नवमतदारांसाठी सरकारची "फिंगी' सेल्फी पाठवा स्पर्धा, अपंगांसाठी व्हिलचेअर टॅक्‍सी व डोलीची सुविधा अशा विविध सोई पुरवण्यात येणार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था केली असून काही सामाजिक संघटनांकडून जोरदार मतदार जागृती करण्यात आली आहे. दुसरीकडे, सलग सुट्यांमुळे मतदार मोठ्या प्रमाणावर शहराबाहेर गेल्याने राजकीय कार्यकर्ते मात्र चिंतेत आहेत.
 
निवडणुकीसंदर्भात समाजमाध्यमांवरही जोरदार चर्चा-वादविवाद झाल्याने तरुणाईमध्ये मतदानाबाबत मोठी उत्सुकता आहे. मतदान मोठ्या प्रमाणात व्हावे म्हणून सरकारी यंत्रणांबरोबर अनेक स्वयंसेवी संस्थांनीही जनजागृती केली आहे. त्यामुळे मतदान करायचेच, असा तरुणांचा निर्धार आहे. यंदा मतदान केंद्रांवरील मोबाईलबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे होणार आहे. मात्र मतदान केल्यानंतर शाई लावलेल्या बोटाचे सेल्फी फोटो (फिंगी) पाठवण्याच्या तरुणाईच्या उत्साहावर त्यामुळे विरजण पडू नये व तरुण मतदानासाठी यावेत म्हणून प्रशासनाने काळजी घेतली आहे. मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या विहित मर्यादेच्या बाहेर येऊन आपली सेल्फी काढून त्याचे छायाचित्र व आपला पूर्ण तपशील जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या ई-मेलवर किंवा व्हॉट्‌सऍप क्रमांकावर पाठवावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. "माय फर्स्ट व्होट सेल्फी' स्पर्धेमुळे प्रथमच मतदान करणाऱ्यांमध्ये उत्साह असून मतदान करताना आई किंवा बाबाला अन्यथा मित्रांना शंभर मीटर लांब उभे करून त्यांच्याकडे आपला मोबाईल द्यायचा व बाहेर येऊन आपला सेल्फी काढायचा असे प्लॅन काही तरुणांनी केले आहेत. 

महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप 
महिला सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून केवळ महिलांमार्फत संचालन करण्यात येणारी "सखी मतदान केंद्रे'ही उभारण्यात आली आहेत. त्या केंद्रांतील केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष आणि अन्य सर्व कर्मचारी महिलाच असतील. अशी केंद्रे रांगोळी, पोस्टर आदींनी सजविण्यात येतील. केंद्रावर येणाऱ्या महिला मतदारांना सॅनिटरी पॅडचे पाकीट व सर्वांना शीतपेये उपलब्ध करून दिली जातील. 

अपंगांसाठी विशेष व्यवस्था 
अपंग मतदारांना घरापासून मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी व तेथून परत नेण्यासाठी प्रशासनानेच विशेष वाहनव्यवस्था केली आहे. व्हिलचेअरवर बसलेल्या मतदाराला त्यावरून उतरावे लागणार नाही. व्हिलचेअर यंत्राच्या साह्याने वाहनात ठेवण्याचीही व्यवस्था आहे. मतदान केंद्रे वरच्या मजल्यावर असतील तर अपंगांना तिथे नेण्यासाठी डोलीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. 

अखेरपर्यंत संवाद सुरू 
मतदानाबाबत उत्सुकता असली तरी रेल्वे आणि एसटीची गर्दी पाहता अनेक मतदार यापूर्वीच शहराबाहेर गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय नेते-कार्यकर्ते चिंताग्रस्त झाले आहेत. शनिवारी (ता. 27) संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपल्यावर अनेक उमेदवारांनी वैयक्तिक ओळखीच्या मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला. त्यांचे खास कार्यकर्तेदेखील विविध मंडळांचे पदाधिकारी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेत होते. रविवारी अनेक उमेदवार निःशंकपणे विवाह सोहळे व अन्य खासगी कार्यक्रमांत सहभागी झाले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन मतदानाच्या दिवसाची आखणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com