'10 च्याआत घरात'मुळे खवय्यांचा प्रतिसाद कमी, व्यवसाय यथातथाच होत असल्याची हॉटेल चालकांची खंत

'10 च्याआत घरात'मुळे खवय्यांचा प्रतिसाद कमी, व्यवसाय यथातथाच होत असल्याची हॉटेल चालकांची खंत

मुंबई, ता 15 : मुंबईत 33 टक्के क्षमतेने हॉटेल उघडून दहा दिवस झाले तरी अद्याप खवय्यांचा प्रतिसाद म्हणावा तसा नसल्याचा हॉटेलचालकांचा अनुभव आहे. उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांनी अद्यापही हॉटेलकडे पाठ फिरवली असून रात्री दहा वाजता बंद करण्याची वेळ अत्यंत गैरसोयीची ठरत असल्याचेही हॉटेलचालक सांगतात. मुळात या आणि अशाच कडक अटींमुळे मुंबईतील तीस ते चाळीस टक्केच हॉटेल्स सध्या खुली आहेत. अद्यापही बऱ्याच हॉटेलमधील कर्मचारी परत आलेले नाही. उपनगरी रेल्वे सुरु झाल्या व निदान पन्नास टक्के ग्राहकांना घेण्याची परवानगी मिळाली की आम्ही हॉटेल सुरु करू, असेही अनेक जण सांगत आहेत. 

10 च्या आत घरात नको

मुळातच मुंबईत लोक रात्री साडेआठ नऊ वाजता ऑफिसातून घरी येतात, हल्ली ती वेळ आणखी पुढे गेली आहे. त्यानंतर हॉटेलात जावे तर दहा वाजता हॉटेल बंद होत असल्याने मुख्यतः कुटुंबे हॉटेलांकडे फिरकतच नाहीत, असे आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.  त्यात दहा वाजता हॉटेल बंद करण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिस येतात, त्यामुळे नऊ नंतर आम्ही ग्राहकांना घेतच नाही. कोरोनाला वेळेचे बंधन नसल्याने ही वेळ वाढवून पूर्वीसारखी एक पर्यंत करावी, असेही ते म्हणाले. 

तिकिटांचा काळाबाजार

शिवानंद शेट्टी यांचे वडाळा येथे हरियाली नावाचं हॉटेल असून शनिवारी आणि रविवारी तिथं बऱ्यापैकी गर्दी झाली होती, असेही ते म्हणाले. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याचाही फटका बसतो आहे. उत्तरेतून येणाऱ्या गाड्यांची तिकिटे पंधरा वीस दिवस मिळत नाहीत, तिकिटांचाही काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे कर्मचारी नसल्याने खवय्यांची ऑर्डर आणण्यासही वेळ लागतो. आम्ही सोशल डिस्टन्स आणि अन्य नियम पाळतो, पण एकाच गाडीतून पाच-सहा जण किंवा कुटुंब आले तर त्या ग्रूपला एकाच टेबलावर बसू देतो, असेही त्यांनी सांगितले. 

जनजागृती मोहीम हवी - कोहली

तर दहा वाजता हॉटेल बंद होत असल्याने संध्याकाळी सात वाजता कोणीही जेवायला येत नाही, त्यासाठी ही वेळ निदान साडेअकरा केली पाहिजे, असे दादरच्या प्रीतम हॉटेलचे गुरुबक्षिषसिंह कोहली म्हणाले. दुपारी तर फारसे कोणीही येत नाहीत, अजूनही लोक घाबरत असल्याने हॉटेलांमध्ये येत नाहीत असे दिसते, त्यामुळे यासाठी सरकारनेच जनजागृती मोहीम किंवा आवाहने केली तर त्याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले. 

उच्चमध्यमवर्गीय कुटुंबे नाहीत

तर आमच्याकडे मध्यमवर्गीय व कनिष्ठ वर्गीय कुटुंबे थोड्या प्रमाणावर येत आहेत. मात्र उच्च मध्यमवर्गीय कुटुंबे अद्यापही येत नाहीत, असा अनुभव चेंबूरच्या आदर्श हॉटेल चे आदर्श शेट्टी यांनी सांगितला. शेट्टी हे आहार चे माजी अध्यक्ष आहेत. शनिवार-रविवारीही फारसा व्यवसाय झाला नाही, जेमतेम 10 ते 20 टक्केच व्यवसाय होत आहे. आमच्याकडे कर्मचारीही कमी आहेत, उत्तर भारतातून येथे येण्यास त्यांना अडचणी आहेत. त्यामुळे आम्ही मेनू देखील कमीच केला आहे, असेही ते म्हणाले. 

फक्त पार्सल सेवा सुरु

अद्यापही कर्मचाऱ्यांचा तुटवडा व ग्राहकांची कमी संख्या यामुळे फक्त पार्सल सेवा सुरु केली आहे. कारण अन्यथा ग्राहक कमी पण आमचा खर्च तेवढाच अशी परिस्थिती ओढवेल, असे दादरच्या आस्वाद चे सूर्यकांत सरजोशी म्हणाले. आमचे कर्मचारी मुंबईबाहेर राहत असल्याने रेल्वे सुरु झाल्याशिवाय त्यांना येता येणार नाही. पार्सल सेवेचा प्रतिसाद जून-जुलै पेक्षा वाढला असला तरी अजूनही लोक घाबरत आहेत. पन्नास ते पंचाहत्तर टक्के ग्राहकांना परवानगी मिळाली व गाड्या सुरु झाल्या की हॉटेल उघडायचा विचार करू, असेही ते म्हणाले. 

नवरात्रीनंतरच सुरु करू

अजूनही कचेऱ्यांमधील कर्मचारी फारच कमी येतात. सध्याची परिस्थिती पाहता आम्ही फक्त नाश्ताच सुरु ठेवला आहे. चायनीज, मालवणी पदार्थांसह हॉटेल नवरात्रीनंतरच सुरु करू असं सुभाष सारंग हे मालवणी तडकाचे मालक म्हणालेत. 

hotel owners in mumbai unhappy over keeping hotels and restaurants open till only ten

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com