भाईंदरमध्ये चार इमारतींना तडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

भाईंदर - मिरा रोड येथील भाईंदर पालिका क्षेत्रातील हटकेश परिसरातील नवीन इमारतीच्या कामांमुळे या परिसरातील चार इमारतींना तडे गेल्यामुळे येथील ८२ कुटुंबांना बेघर व्हावे लागले आहे. 

आठ महिन्यांपासून पालिका आणि बिल्डरकडे याबाबत तक्रारी करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. तडे गेल्याने रहिवाशांनी काशिमीरा पोलिसांत मंगळवारी बिल्डरविरोधात तक्रार केली. आज पालिकेने सदरचे काम थांबविण्याची नोटीस बिल्डरला दिली आहे. 

मंगळवारी रात्री या भागातील चार इमारतींना तडे गेल्याने तेथील रहिवाशांना पालिकेने इतर ठिकाणी हलविले आहे. इमारतीसाठी सुरू केलेल्या फायलिंगमुळे बॉलीवूड कॉम्प्लेक्‍समधील अमिताभ, माधुरी, शाहरूख आणि अमन या इमारतींना तडे गेले आहेत. या इमारतीमधील रहिवाशांना कल्पना न देता पालिकेने या इमारती सील केल्याने तेथील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. पालिका आणि बिल्डरकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 

रहिवाशांना प्रमोद महाजन मंडई मार्केट, मीनाताई ठाकरे हॉलमध्ये हलविण्यात आले आहे. ४०० जणांची रात्रीच्या जेवणाची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे.

संबंधित बिल्डरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही; परंतु पालिकेत आमदार नरेंद्र मेहता आणि अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी आलेल्या पत्रकारांना बिल्डरच्या अधिकाऱ्यांनी अरेरावी करताना याबाबत बोलण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचे सांगितले.

आमदार नरेंद्र मेहता हे बिल्डरला संरक्षण देत आहेत. याबाबत पालिका अधिकाऱ्यांना दोन महिन्यांपूर्वी कल्पना देऊन काम थांबविण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. 
 - प्रताप सरनाईक, आमदार 

जे अधिकारी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल. 
- नरेंद्र मेहता, आमदार

Web Title: Four buildings cracks in Bhaindar municipal aera