सोन्याच्या खोट्या नाण्यांपायी गमावले 30 लाख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

अनोळखी भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई : सोन्याच्या खोट्या नाण्याच्या लोभापायी मुंबईतील एका व्यावसायिकाने तब्बल 30 लाख रुपये गमावल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर भागात घडला. विश्‍वास संपादन करण्यासाठी भामट्यांनी अगोदर 10 खरी नाणी दिली होती. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी अनोळखी भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कुर्ला येथील सलून व्यावसायिक राजेंद्रकुमार बलदेव राज आर्या (वय 70) यांचा मुलगा काही कामानिमित्त नाशिकला गेला होता. तो पुन्हा मुंबईला परतत असताना आसनगाव येथील हॉटेलमध्ये भेटलेल्या दोन भामट्यांनी त्याला कंपनीत खोदकाम करताना सोन्याची नाणी सापडल्याचे सांगितले. खातरजमा करण्यासाठी भामट्यांनी त्याला 10 नाणी दिली. घरी आल्यानंतर त्याचे वडील
राजेंद्रकुमार यांनी सोनाराकडून नाण्यांची तपासणी केली असता, ती खरी आढळली. राजेंद्रकुमार यांच्या मुलाने भामट्याला फोन करून याबाबत माहिती दिल्यानंतर आमच्याकडे 30 ते 40 किलो सोन्याची नाणी असून, त्यांची किंमत दोन कोटी असल्याचे भामट्यांनी सांगितले. तसेच केवळ 30 लाखांत 10 किलो नाणी विकत घेण्याचा व्यवहार ठरल्याने पैशाची जमवाजमव करून राजेंद्रकुमार
आसनगाव येथे पोहचले. तेथे एका वयोवृद्ध महिलेसह तिघे भामटे भेटले. राजेंद्रकुमार यांनी 30 लाखांत 10 किलो सोन्याच्या नाण्यांची खरेदी केली. मात्र, तपासणी केली असता, ती सर्व नाणी खोटी निघाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud in Gold coin; 30 lakhs loss