"त्या" महिलेकडून चार वर्ष शिक्षिकेचे काम करून घेतले आणि...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

  • शाळेत स्थायी नोकरीच्या नावाने फसवणूक 
  • चार वर्षे नोकरी करूनही पगार नाही;
  • मुख्य आरोपीला अटक 

मुंबई : परळ येथील हिंदी माध्यमाच्या शाळेत शिक्षकाची स्थायी नोकरी देण्याच्या नावाखाली ग्रॅंट रोड येथे राहणाऱ्या विवाहितेकडून पैसे घेतल्याप्रकरणी तोतया ट्रस्टीला दा. भ. मार्ग पोलिसांनी अटक केली. चार वर्षे काम करूनदेखील पगार न दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. 

जनहित याचिका दाखल झाल्यानंतरच जाग येते का ?

अरुण देवीप्रसाद सिंग (40) असे अटक आरोपीचे नाव असून तो विलेपार्ले येथील रहिवासी आहे. यापूर्वी याप्रकरणी अरुण सिंगचा नातेवाईक दीपक सिंग व शाळेचा ट्रस्टी माणिकलाल शाह यांना अटक केली आहे. धनादेश व रोख रकमेच्या स्वरूपात आरोपींनी तक्रारदार महिलेच्या कुटुंबियांकडून आठ लाख 85 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. आरोपी अरुणसिंग व दीपक सिंग यांनी परेल येथील एका नामांकित हिंदी शाळेत नोकरीची जाहिरात दिली होती. त्यानुसार तक्रारदार किरण सिंग यांनी तेथे जाऊन मुलाखत दिली होती. त्यानंतर त्यांना अरुण सिंग यांनी दूरध्वनी करून सहायक शिक्षिका म्हणून नोकरी हवी असल्यास 10 लाख रुपये भरण्यास सांगितले.
 

धक्कादायक : एसटीच्या गाडगेबाबा योजनेचा बोजवारा

त्यानंतर तक्रारदार किरण यांच्या सासऱ्यांनी दोन महिन्यांत आठ लाख 85 हजार रुपये भरले. त्यानंतर किरण यांनी त्या शाळेत महिनाभर काम केल्यानंतर पगाराची विचारणा केली. त्या वेळी स्थायी नोकरी झाल्यावर संपूर्ण पगार एकत्र मिळेल असे सांगितले. चार वर्षे काम केल्यानंतरही किरण यांना पगार मिळाला नाही. त्यानंतरही स्थायी नोकरी न मिळाल्याने कुटुंबियांनी आरोपींकडे याबाबतची विचारणा केली. त्यानंतर आरोपीने दिलेला धनादेशही वठला नाही. त्यानंतर त्याने स्टॅम्प पेपरवरही पैसे परत करण्याचे लिहून दिले. पण पैसे न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांकडे गेल्या वर्षी तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून अरुण सिंगला शनिवारी डॉ. दा. भ. मार्ग पोलिसांनी अटक केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud in the name of a permanent job at school