एसटीच्या गाडगेबाबा स्वच्छता योजनेचा बोजवारा 

एसटीच्या गाडगेबाबा स्वच्छता योजनेचा बोजवारा 

मुंबई : एसटी महामंडळातील गाडगेबाबा स्वच्छता योजनेचा बोजवारा उडाला आहे. कंत्राटदार नेमलेले असतानाही स्थानके-आगारांचा परिसर, बसगाड्या आणि कार्यालयांची स्वच्छता होत नाही. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, उरण, पनवेल या आगारांत सर्वत्र कचरा पसरल्याचे दिसत आहे. 

एसटी महामंडळाने स्थानकांत येणाऱ्या बसगाड्या स्वच्छ करूनच रस्त्यांवर सोडण्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून बसगाड्यांची आतून आणि बाहेरून साफसफाई करणे अपेक्षित आहे. परंतु, मुंबई विभागातील एसटीच्या सर्व स्थानकांत बसगाड्या धुण्याच्या केंद्रांवर आधुनिक यंत्रसामग्री आणि खासगी कंपनीचे कर्मचारी नसल्यामुळे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे एसटी आगारे-स्थानकांच्या परिसरातही कचरा पसरल्याचे आढळते. 

लांब पल्ल्याच्या प्रवासात अनेक प्रवाशांना उलट्या होतात. अनेक प्रवासी नाश्‍ता अथवा जेवण केल्यानंतर उरलेले पदार्थ व प्लास्टिक पिशव्या बसमध्येच टाकतात. हा कचरा उचलणे आणि बसगाड्यांची धुलाई करणे ही कामे एसटी कर्मचाऱ्यांनाच करावी लागत आहेत. खासगी कंपनीला कंत्राट देऊनही बसगाड्यांची स्वच्छता होत नसल्याचे काही वाहकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

साडेचारशे कोटी कचऱ्यात 
एसटी महामंडळाने खासगी कंपनीला तीन वर्षांसाठी साफसफाईचे सुमारे 450 कोटींचे कंत्राट दिले असून, दरवर्षी 10 टक्के दरवाढ दिली आहे. संबंधित कंपनीने बसगाड्या आणि स्थानके-आगार परिसराची दररोज साफसफाई करावयाची असून, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावयाची आहे. परंतु, तशी स्थिती कुठेही दिसत नाही. त्यामुळे एसटीचे 450 कोटी रुपये कचऱ्यात गेल्याचे बोलले जात आहे. 

मी सोमवारी रजेवर आहे. स्वच्छतेसंदर्भात अधिक माहिती घेतल्यानंतर मंगळवारी अधिक सांगता येईल. 

- राजेंद्र जगताप, मुंबई विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com