
वजन काट्याला इलेक्ट्रॉनिक चिप लावत व्यावसायिकांची फसवणूक
डोंबिवली - इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलचा अपहार करून बांधकाम व्यावसायिक तसेच स्टील व्यापारी यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपी हे कंपनीत माल आणताना कमी आणत असत व हि बाब कंपनीच्या निदर्शनास येऊ नये म्हणून वजनकट्याला इलेक्ट्रॉनिक चिप लावून रिमोट च्या सहाय्याने मालाचे वाढीव वजन दाखवीत असत. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी चार वाहन चालक, एक गाडी मालक, एक भंगार व्यावसायिक व एक चिप बसिवणारा अशा सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 2 ट्रक व 42 टन स्टिल असा 2 कोटी 8 लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी चिप बनविणारा इंजिनिअर मानसी सिंग हा अद्याप फरार असून त्याचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.
डोंबिवलीतील अनंत रिजन्सी या बांधकाम ठिकाणी 47 टन स्टिलची ऑर्डर देण्यात आली होती. परंतू प्रत्यक्षात तीन ट्रक मधून 42 टन स्टिलच बांधकाम ठिकाणी आले. 5 टन मालाची चोरी झाल्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याअनुषंगाने तपास करत असताना हा पाच टन माल जालना येथील एका भंगार विक्रेत्याला विकण्यात आला होता. मालाचा अपहार केल्याचे लक्षात येऊ नये, कंपनीत माल ऑर्डरच्यात वजनाचा मोजला जावा यासाठी आरोपी हे कंपनीतील वजन काट्याला इलेक्ट्रॉनिक चिप लावली होती. ही चिप रिमोटने ऑपरेट केली जात होती. कंपनी बंद असेल त्या दिवशी कंपनीत येऊन आरोपी चिप बसवित असत. ज्यावेळेस गाडीचे वजन केले जाई त्यावेळेस रिमोटने ती चिप ऑपरेट करण्यासाठी ते गाडीच्या आसपास रहावे म्हणून गाडीचा ट्रान्सपोर्टर आहोत असे ते भासवित असत.
याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी मुंब्रा येथून इलेक्ट्रॉनिक चिप बसविणारा फिरोज शेख, वाहन चालक - मालक नितिन चौरे, दिलबागसिं गिल, दिदिरसिंग राजू, हरजिंदरसिंग राजपूत, हरविंदरसिंग तुन्ना यांसह भंगार विक्रेता शिवकुमार उर्फ मिता चौधरी यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 कोटी 8 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चोरी गेलेला 15 टन वजनाचा 12 लाखांचा मालही जप्त करण्यात आला आहे.
यातील मुख्य आरोपी इंजिनिअर मानसी सिंग याचा शोध पोलिस घेत आहेत. त्याने अशा पद्धतीने किती चिप बनविल्या आहेत, त्या कोठे कोठे लावल्या गेल्या आहेत याचा देखील तपास केला जात असून मुख्य आरोपी सापडल्यानंतर अनेक गुन्ह्यांचा उलगडा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली. चिप बसविणारा फिरोश शेख याच्यावर यापूर्वी भंगार चोरीचे 6 गुन्हे दाखल आहेत.
Web Title: Fraud Using Electronic Chip To Weight Machin 7 Persons Arrested Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..