ऑडीचा 'कार'नामा ; उंदीर पळवण्यासाठी लावले तब्बल 50 हजाराचे यंत्र; झाले मात्र उलटेच

ऑडीचा 'कार'नामा ; उंदीर पळवण्यासाठी लावले तब्बल 50 हजाराचे यंत्र; झाले मात्र उलटेच


ठाणे : एका नामांकित कार उत्पादक कंपनीच्या 'कार'नाम्यामुळे ठाण्यातील महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आहे. कार कंपनीच्या अधिकृत वर्कशॉपच्या माध्यमातून तब्बल 50 हजारांचा माऊस प्रोटेक्टर (उंदीर पळवण्याचे यंत्र) कारमध्ये बसवूनदेखील 'उंदीर मामा'काही पळालेच नाहीत. उलट, कारमध्येच मुक्काम ठोकलेल्या उंदरांनी कारच्या वायरिंगचे नुकसान केल्याने कार मालकाला नाहक मनस्ताप सोसावा लागला आहे. तेव्हा, आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने कारमालकाने कार कंपनीविरोधात थेट पोलिसात तक्रार दिली आहे.

ठाण्यातील राबोडी, साकेत कॉम्लेक्समध्ये राहणाऱ्या इलिशा व अब्दुल खान या दाम्पत्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. 2017 मध्ये इलिशा यांनी अलिशान ऑडी कार घेतली. मात्र, काही महिन्यातच पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या कारमध्ये उंदरांनी धुमाकूळ घालून कारची वायरिंग क्षतीग्रस्त केल्याने खान यांची कार नादुरुस्त झाली. दुरुस्तीसाठी कार वागळे इस्टेटमधील गिलानीवाडी येथील ऑडीच्या अधिकृत कार्यशाळेत नेली. तेव्हा, कार्यशाळेतील मॅकेनिकने उंदरांच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी कारमध्ये 50 हजार किमतीचा 'माऊस प्रोटेक्टर' बसवला. 

त्यानंतर, लॉकडाऊन सुरू झाल्याने कार इमारतीच्या आवारातच उभी होती. दरम्यान, 27 जुलैला खान दाम्पत्याने कार सुरू करण्याचा प्रयत्न केला असता, पुन्हा पूर्वीचीच समस्या उद्भवली. म्हणून, कार्यशाळेत कार दाखवली असता, मॅकेनिकने उंदरांचे कारनामे सुरूच असून दुरुस्तीसाठी दोन लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे खान यांना सांगितले. मग, 50 हजारांचा 'माऊस प्रोटेक्टर' काय कामाचा ? असा सवाल करीत खान यांनी मॅकेनिकला जाब विचारला. 

मात्र, त्यांची दखल कार्यशाळेने न घेतल्याने अशाप्रकारे इतर कुणाची अशी फसवणूक होऊ नये, तसेच कार्यशाळेला अद्दल घडवण्यासाठी खान यांनी राबोडी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

-----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com