ठाण्यातील मॉल्समध्ये मोफत पार्किंगचे भिजत घोंगडे

ठाणे :  शहरातील मॉलमध्ये पार्क केलेली वाहने.(छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे : शहरातील मॉलमध्ये पार्क केलेली वाहने.(छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

ठाणे : मल्टिप्लेक्‍स अथवा मॉल उभारताना या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र ही अत्यावश्‍यक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देताना मॉलधारक सर्रास वाहनचालकांकडून पार्किंग शुल्काची वसुली करतात. ही वसुली बंद करण्यासाठी पाच महिन्यांपूर्वी ठाण्यात भाजपाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता. पण सत्ताधारी शिवसेनेने हा विषय अद्याप महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत न आणल्याने या विषयाचे घोंगडे भिजत पडले आहे. 

पुणे आणि नाशिक महापालिकेने शहर विकास नियंत्रण नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केल्याने शहरातील मॉल व मल्टिप्लेक्‍समध्ये नागरिकांना मोफत पार्किंगची सुविधा जून महिन्यापासून मिळाली आहे. त्याच धर्तीवर ठाणे शहरातील मॉल व मल्टिप्लेक्‍समध्ये मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी जून महिन्यात केली होती.

ठाणे शहरात असलेल्या पाच मोठ्या मॉलमध्ये पार्किंगसाठी दहा रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. हे शुल्क बेकायदेशीर असून या प्रकरणी महापालिकेने तातडीने ठराव मंजूर करून शहरातील वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मॉल व मल्टिप्लेक्‍समध्ये निशूल्क पार्किंग सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी महापौर मीनाक्षी शिंदे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली होती. 

त्यावेळी त्यांना सत्ताधाऱ्यांकडून हा विषय नागरिकांशी संबंधित असल्याने त्यावर लवकरच निर्णय होईल, असे आश्वासन सत्ताधारी शिवसेनेकडून देण्यात आले होते. पण ठाण्यातील पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना करमाफीचे घोडे सत्ताधारी शिवसेनेकडून अद्याप भिजत ठेवण्यात आले आहे, त्याप्रमाणे सध्या मॉलमधील मोफत पार्किंगचा विषयही तसाच ठेवण्यात सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानली आहे. 

गैरवापरला विरोध 
शहरातील अनेक मॉल हे महामार्ग अथवा मुख्य रस्त्यालगत आहेत. यापूर्वी काही मॉलमध्ये पार्किंगची मोफत सुविधा उपलब्ध होती. मात्र काही वाहनचालकांकडून सकाळी या ठिकाणी आपली वाहने पार्क करून थेट रात्री ही वाहने घरी घेऊन जात होते. त्यामुळे मॉलचे पार्किंग नेहमी फुल्ल असल्याचे चित्र होते. त्यानंतर मोफत पार्किंग देणाऱ्या मॉलचालकांनीही ही सुविधा बंद केल्याचा दावा केला जात आहे. 

मॉलमधील मोफत पार्किंगच्या नियमाच्या अंमलबाजवणीची मागणी आमच्याकडून यापूर्वी करण्यात आली आहे. पण त्याला अपेक्षित प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे पुढील सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित करणार आहे. या विषयावर बहुसंख्य नगरसेवकांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास आहे. जर सरसकट मोफत पार्किंग देणे शक्‍य नसेल तर किमान पहिल्या तीन तासांकरिता तरी मॉलने मोफत पार्किंग उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. 
- मनोहर डुंबरे 
भाजपा नगरसेवक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com