‘फ्रेंडशिप डे’साठी बाजारपेठ सजली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

सोशल मीडियाच्या जगात फेसबुक, व्हॉटस्‌ॲपवर कितीही मेसेज फॉरवर्ड करता येत असले तरी महाविद्यालयीन तरुणाई मात्र मित्रांना भेटून फ्रेंडशिप बॅंड बांधण्यालाच प्राधान्य देते. त्यामुळे दरवर्षी नाविन्यपूर्ण फ्रेंडशिप बॅंडनी मार्केट सजलेले असतात.

मुंबई : महाविद्यालयीन जीवनात फ्रेंडशिप डेला प्रचंड महत्त्व असते. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासूनच ऑगस्टमध्ये येणाऱ्या फ्रेंडशिप डेचे नियोजन युवा वर्गामध्ये सुरू असते. कॉलेजचे पहिले वर्ष असणारी तरुणाई तर महाविद्यालयीन आयुष्यातील या पहिल्या सेलिब्रेशनसाठी खूप उत्सुक असते. या निमित्ताने जुळलेले बंध आणि आठवणी आयुष्यभर स्मरणात राहणाऱ्या असतात.

आजच्या सोशल मीडियाच्या जगात फेसबुक, व्हॉटस्‌ॲपवर कितीही मेसेज फॉरवर्ड करता येत असले तरी महाविद्यालयीन तरुणाई मात्र मित्रांना भेटून फ्रेंडशिप बॅंड बांधण्यालाच प्राधान्य देते. त्यामुळे दरवर्षी नाविन्यपूर्ण फ्रेंडशिप बॅंडनी मार्केट सजलेले असतात. यावर्षी इंपोर्टेड लॉक असलेल्या ब्रेसलेट स्टाईलमधील फ्रेंडशिप ब्रेसलेट, कपल रिंग व कपल लॉकेट नव्याने मार्केटमध्ये आले आहेत व त्यांना तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सीवुडस्‌ येथील मिक्‍स अँड मॅचच्या विक्रेत्यांनी सांगितले. 

मणी, गणपती बाप्पा, कार्टुन, वूड आणि इंग्रजी आद्याक्षरे यांच्या स्वरूपात असलेले हे ब्रेसलेटस्‌ मेटल, अक्रेलिक व कॉपरमध्ये उपलब्ध असून त्यांची किंमत २५ ते ५५ रुपयांपर्यंत आहे. जस्ट फ़्रेंडस, फ्रेंड्‌स फॉरेव्हर, बेस्ट फ्रेंड आदी प्रिंट असलेल्या ब्रेसलेट रिबीन्सची किंमत १० ते ३० रु., तर लेस, धागा व मेटलचे कॉम्बिनेशन असणारे फ्रेंडशिप बॅंडची किंमत ४५ रुपयांपासून सुरू होत आहे. किंग क्वीन लिहिलेल्या मेटलच्या कपल रिंग तसेच रबर, अक्रेलिकच्या प्रिंटेड अंगठ्यादेखील तरुणाईला आकर्षित करत आहेत. या अंगठ्यांची किंमत १० ते १२० रु.पर्यंत आहे. लहान मुलांसाठीदेखील छोट्या साईजचे प्रिंटेड इलेस्टिक बॅंड मार्केटमध्ये उपलब्ध असून, त्यांची किंमत १० रुपयांपासून सुरू होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For 'Friendship Day' The market is decorated