हप्तेबाजीच्या तगाद्याला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

दिनेश गोगी
शुक्रवार, 3 मे 2019

- पोलिसाकडून मागितला जात होता हफ्ता.

- दरमहिन्याला दहा हजार रुपये.

उल्हासनगर : एका 20 वर्षीय ज्यूस विक्रेत्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने ही आत्महत्या पोलिसाकडून मागण्यात आलेल्या हफ्तेबाजीला कंटाळून केली असल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना काल (गुरुवार) रात्री उल्हासनगरात घडली.

सतीश खेडकर उर्फ गुडडू असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नातलगांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार देताना मध्यवर्ती पोलिस ठाण्यासमोर धरणे दिल्यावर आणि शिवसेनेने धाव घेतल्यावर पवन केदारे या पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा कोर्ट परिसरात सतीश खेडकर राहत असून त्याने हिराघाट चौकात एका भाडयाच्या गाळ्यात ज्यूस, चाइनीज, सँडविच सेंटर सुरु केले होते. या सेंटरमध्ये गर्दी होत असल्याने आणि ते रात्री उशिरापर्यंत सुरु राहत असल्याने पोलिसांनी दोनदा कारवाई केली होती. कारवाई न करण्याच्या मागणीसाठी मध्यवर्ती ठाण्याचे पोलिस पवन केदारे हे दरमहिन्याला दहा हजार रूपयांचा हप्ता मागत होते. या तगाद्याला कंटाळून सतीश खेडकर याने गळफास घेऊन स्वतःला संपवून टाकले, असा आरोप करून जोपर्यंत पोलिस पवन केदारे यांच्यावर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा सतीशच्या नातलगांनी घेऊन मध्यवर्ती पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरु केले होते.

हा प्रकार समजताच शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,नगरसेवक कलवंतसिंग सोहता, स्वप्निल बागुल, नाना बागुल, अंकुश म्हस्के, नगरसेविका सुरेखा आव्हाड आदींनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर सहाय्यक पोलिस आयुक्त डी. डी. थेले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पवन केदारे या पोलिसावर सतीश खेडकर याला आत्महत्तेस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल रात्री आत्महत्या करणारा सतीश खेडकर याचा मृतदेह मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलिस पवन केदारे या पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आल्यावर नातलगांनी सतीशचा मृतदेह ताब्यात घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Fruit Juice Seller Committed Suicide