फळे, भाज्या स्वस्त! 

फळे, भाज्या स्वस्त! 

नवी मुंबई - राज्यभर चांगला पाऊस झाल्यामुळे शेतमालाचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये फळे आणि भाज्यांची सरासरीपेक्षा अधिक आवक वाढली असून त्यांचे भाव घसरले आहेत. गेल्या आठवड्यात प्रति किलोला 150 ते 200 रुपयांना मिळणारे सफरचंद आता 60 ते 100 रुपयांत विकण्यात येत आहेत. मोसंबी, पपई या फळांसह हिरवी मिरची, फ्लॉवर, कोथिंबीर या भाज्यांचे भावही तब्बल 20 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. महागाईचे चटके सोसणाऱ्या ग्राहकला त्यामुळे दिलासा मिळाला आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज सरासरी 500 वाहने फळे-भाज्या घेऊन येतात. चार दिवसांपासून त्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आता 600 वाहनांद्वारे मालाची आवक होत आहे. बाजार समितीमध्ये सध्या पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सासवड येथून भाज्या येत आहेत; तर अमरावती, अकोला, परभणी, नांदेड, जालना आणि औरंगाबाद येथून मोसंबी-संत्री येत आहेत. या व्यतिरिक्त पुणे जिल्ह्यातून सीताफळाची आवकही वाढली आहे. त्याला जोड म्हणून काश्‍मीर आणि हिमाचल प्रदेशमधून येणाऱ्या सफरचंदांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सध्या बाजारात भाजीपाल्याप्रमाणे फळांची संख्याही चांगलीच वाढल्यामुळे भावात मोठी घसरण झाली आहे. त्या तुलनेत ग्राहकांचे प्रमाण वाढले नसल्याने भाजीपाला आणि फळांच्या बाजाराला उठाव मिळालेला नाही. 

यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे शेतमालासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतमालाचे प्रमाण अधिक वाढल्याने येत्या काळात भाजीपाल्याचे दर आणखी घसरणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. 

दुसरीकडे बाजारातील या घसरणीमुळे शेतकरी मात्र चिंतातूर आहे. उत्पन्न चांगले निघाल्याने चांगली रक्कम हाती येण्याची अपेक्षा होती, ती फोल ठरली आहे; अशी भावना शेतकऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

पावसाळा सरत असताना आणि थंडीची चाहूल लागण्या अगोदर शेतमालाला पोषक वातावरण तयार असते. या वेळीही त्याचा प्रत्यय आला. भाजीपाला आणि फळांचे प्रमाण वाढले आहे. काही काळ फळांचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आल्याने बाजारभाव कमी झाले आहेत. 
- संजय पानसरे, फळ व्यापारी 

राज्याच्या कानाकोपऱ्यात भाजीपाल्याचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक आहे. पुढील काळातही मालाचे प्रमाण वाढले तर आणखी भाव घसरण्याची शक्‍यता आहे. 
- कैलास ताजणे, भाजीपाला व्यापारी 

कोथिंबिरीचे काय करायचे? 
मुंबई कृषी उत्पन्न बाजारात सध्या तीन हजार किलोपेक्षा अधिक कोथिंबीर जुड्या आल्या आहेत. त्या जुडीचा बुधवारी भाव 15 ते 20 रुपये होता; मात्र गुरुवारी 39 टेम्पोमधून कोथिंबिरी आल्यामुळे 5 ते 10 रुपये जोडी असा भाव झाला; मात्र एवढे दर खाली कोसळल्यानंतरही ग्राहकांकडून कोथिंबिरीची खरेदी होत नाही. तसेच कोथिंबीर हे नाशवंत माल असल्याने व्यापारी चिंतेत पडला आहे. 

फळे आणि भाव (प्रति किलो रुपये) 
मोसंबी - 10 ते 15 
संत्रे - 5 ते 40 
सीताफळ - 20 ते 150 
सफरचंद - 80 ते 100 
पपई - 8 ते 12 रुपये किलो 
टरबूज - 25 
डाळिंब - 40 ते 125 

भाज्या आणि भाव (प्रति किलो रुपये) 
टोमॅटो - 4 ते 5 
भेंडी - 10 ते 12 
आले ः 40 ते 50 
हिरवी मिर्ची - 12 ते 16 
हिरवा वाटाणा - 50 ते 60 
फ्लॉवर - 8 ते 10 
कोबी - 4 ते 5 
वांगी - 10 ते 12 
गवार - 28 ते 30 
दूधी भोपळा - 12 ते 14 

तीन दिवसांत मालगाड्यांची आवक 
27 सप्टेंबर - 575 गाड्या 
26 सप्टेंबर - 610 गाड्या 
25 सप्टेंबर - 625 गाड्या 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com