कुर्ला नाल्यात कचऱ्याचा ढीग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई : यंदा मुसळधार पावसात रेल्वे रुळावर पाणी साचू नये, म्हणून रेल्वे हद्दीतील नाल्यांची तीनदा सफाई करण्यात आली असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. मात्र, कुर्ला-विद्याविहार रेल्वेस्थानकांदरम्यान असलेल्या मुख्य कुर्ला नाल्यात अद्याप कचऱ्याचा ढीग साचलेला दिसतो. त्यामुळे मध्य रेल्वेने जवळपास नाल्याची साफसफाई पूर्ण केल्याचा दावा फोल ठरला आहे. 

मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात नाल्यातील पाणी वेगाने रुळावर येते. त्या पाण्यासोबत कचराही येतो. त्यामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा वारंवार ठप्प होते. यंदा अशा घटना टाळाव्यात म्हणून मध्य रेल्वेने मॉन्सूनपूर्व रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांची साफसफाई पूर्ण केल्याचे म्हटले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिकेचे पंपही बसवण्यात आले आहेत. 

मध्य रेल्वेच्या कुर्ला-विद्याविहार स्थानकांदरम्यान असलेल्या मुख्य नाल्याची पूर्णपणे साफसफाई करण्याबाबत मध्य रेल्वेला विसर पडला आहे. कुर्ला स्थानकातील मध्यभागी असलेल्या मोठ्या नाल्याला दोन नाले एकत्र येऊन मिळतात. मोठा नाला पालिका व रेल्वेच्या हद्दीतून वाहतो. पालिकेच्या हद्दीतील नाल्याची साफसफाई करण्यात आली आहे. रेल्वेने त्यांच्या हद्दीतील नाल्याच्या मध्यभागी जाळी लावली आहे. जाळी लावलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. 
 
मोठ्या पावसात लोकल सेवा ठप्प 
पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यास पालिकेच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात पाणी वेगाने रेल्वेतील नाल्यात येण्याची शक्‍यता आहे. पाण्याच्या वेगात नाल्याच्या जाळीशेजारील कचरा रुळावर येण्याचा धोका आहे. कुर्ला स्थानकात पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप लावले तरी कचऱ्याची समस्या जैसे थे असल्यामुळे मुसळधार पावसात लोकल सेवा ठप्प होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

मध्य रेल्वे प्रशासनाने स्वत:ला वाचवण्यासाठी साफसफाईचा बडेजाव केला आहे. कुर्ला स्थानकातील नाल्याच्या स्थितीवरून प्रत्यक्षात पूर्णत: साफसफाई झाली नसल्याचे दिसून येते, असे रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांनी म्हटले. 

Web Title: full garbage under in drainage in kurla