Mumbai News : गांधारी रिंगरोड पालिकेने केला बंद

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी दगड रचत रिंगरोड बंद
Gandhari Ring Road closed by mumai municipality to prevent accidents traffic jam
Gandhari Ring Road closed by mumai municipality to prevent accidents traffic jamsakal

डोंबिवली - कल्याण शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएकडून कल्याण रिंग रोड प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. गांधारी ब्रिज पर्यंत या रिंगरोडचे काम पूर्ण करण्यात आले असून पुढील काम सुरु आहे. या रस्त्याचे काम सुरु असतानाही दुचाकीस्वार या मार्गाचा वापर करत असून याठिकाणी अपघातांचे सत्र सुरु आहे.

रस्त्यावर कोठेही गतीरोधक नसल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. वाहतूक विभाग, पोलिस प्नशासनाने येथे अपघात होत असून त्यात लक्ष घालण्याची सूचना पालिका प्रशासनाला केली होती.

अपघातांचे हे सत्र रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात गांधारी ब्रिज जवळ रस्त्यावर मोठे दगड रचत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. पालिका प्रशासनाचा हा उतारा कितीदिवस तग धरतो हे आता पहावे लागेल.

कल्याण मधील वाहतूककोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएकडून रिंगरोड प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. कल्याण, डोंबिवली, टिटवाळ्यासह ग्रामीण भागाला जोडण्यासाठी रिंग रोड प्रकल्प महत्त्वाचा आहे.

या रिंगरोडचे काम पूर्ण स्वरुपात झालेले नाही. रिंगरोड मार्गातील गावदेवी मंदिर कोलिवली ते गांधारी, बीएसयूपी प्रकल्प, अटाळी पूल, वडवली पर्यंत या रस्त्याचे काम झालेले आहे. वडवली पुढील टप्प्याचे काम एमएमआरडीएच्या वतीने सुरु आहे. रस्त्याचे काम सुरु असले तरी काही दुचाकीस्वार या रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करतात.

तर निर्जनस्थळ असल्याने काही दुचाकीस्वार या रस्त्यावर स्टटंबाजी करत दुचाकी चालवतात. काही दुचाकीस्वारांचे ग्रुप या रस्त्यावर दुचाकी रेस लावतात. गेल्या दोन तीन महिन्यात या रस्त्यावर 8 च्या आसपास अपघाताच्या घटना घडल्या असून तीन जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तसेच या ठिकाणी काही तरुण सायंकाळच्या वेळी नशा करण्यासाठी आजूबाजूच्या जंगल परिसराचा आडोसा घेऊन तेथे पार्ट्या करताना आढळून आले आहेत.

नव्याने बांधण्यात आलेल्या या रस्त्यावर कोठेही गतिरोधक नसल्याने वाहनचालक आपली वाहने वेगाने चालवितात. वाहनावरिल चालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नविन बाह्यवळण रस्त्यावर गतिरोधक उभारण्याची मागणी मध्यंतरी होत होती. या रस्त्यावर सकाळ संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी बरेचसे नागरिक येत असतात. वाहनचालकांमुळे पादचारी देखील जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाहनचालकांसोबतच पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न येथे निर्माण झाला आहे. पोलिसांकडून वेळोवेळी आवश्यक त्या सूचना आणि कारवाई करुनही बेदरकारपणे वाहन चालविण्याचे प्रकार थांबत नाहीत. अखेर पोलिस प्रशासनाने येथील अपघात रोखण्यासाठी पालिका प्रशासनाला यात लक्ष घालण्याची सूचना केली होती.

अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी दगड लावून हा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर झीकझॅक पद्धतीने दगड लावून ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरुन काही दुचाकीस्वारांनी आपली वाहने रस्त्यावर घुसवली तरी त्यांच्या वाहनांचा वेग हा मर्यादित राहील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

या रस्त्यावर सध्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. पोलिस प्रशासनाकडून येथे अपघात होत असल्याची माहिती आम्हाला प्राप्त होत आहे. हे अपघात टाळण्यासाठी आम्ही हा रस्ता तात्पुरत्या स्वरुपात बंद केला आहे. एमएमआरडीएकडून या रस्त्याचे काम सुरु असून तो रस्ता अद्याप केडीएमसीकडे हस्तांतरीत झालेला नाही.

या रोडचे उर्वरीत काम सुरु आहे. गांधारी ब्रिज जवळ हा रस्ता बंद करण्यात आला आहे. पालिकेच्या घंटागाड्या येथून ये जा करीत असल्याने या गाड्या ये जा करण्यापुरता रस्ता चालू ठेवण्यात येईल. त्यासाठी झिकझॅक पद्धतीने दगड टाकण्यात येणार आहेत. जेणेकरुन मोटारसायकल स्वार जरी या रस्त्यावर घुसले तरी ते भरधाव वेगाने गाडी चालवणार नाहीत. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या दृष्टीकोनातून दोन्ही दिशेने हा रस्ता बंद करण्यात आला आहे.

राजेश सावंत, प्रभाग क्षेत्र अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com