विवाहितेवर बलात्कार; आठ जणांना अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

मुंबई - पतीला मारहाण करत घराबाहेर काढल्यानंतर पाच जणांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी (ता. 31) जोगेश्‍वरी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

मुंबई - पतीला मारहाण करत घराबाहेर काढल्यानंतर पाच जणांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी (ता. 31) जोगेश्‍वरी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

ही महिला पतीसोबत पवई येथे राहते. पतीला कामावर जाण्यास सोपे पडावे यासाठी हे दाम्पत्य नवीन जागेच्या शोधात होते. याच कारणासाठी ते सोमवारी जोगेश्‍वरी पश्‍चिमेला राहणाऱ्या महिला नातेवाईकाकडे आले होते. रात्र झाल्याने नातेवाईकांच्या आग्रहास्तव ते तिथेच राहिले. नातेवाईक महिला कामावर गेल्याने हे दाम्पत्यच घरात होते. काही वेळाने त्यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. तेव्हा सर्व आरोपी त्या घरापासून काही अंतरावर सिगारेट ओढत उभे होते. काही वेळाने घरात घुसून त्यापैकी तिघांनी महिलेच्या पतीला मारहाण करत बाहेर नेले. नंतर पाच जणांनी विवाहितेवर बलात्कार केला. त्यानंतर सर्वांनी तेथून पळ काढला.

याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी पहाटे अंबोली पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यानंतर उपनिरीक्षक दया नायक यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. नस्ताईज जफरअली शेख ऊर्फ बाबू, नागेश धनगर ऊर्फ काटेरी, इम्रान मोहम्मद शेख, मोहम्मद गुलाम हुसेन खान, राकेश खैरे, झहीर शरीफ खान ऊर्फ जयू, इजाज अहमद शेख, प्रदीप घागट अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी काहींना अमली पदार्थांचे व्यसन आहे. पोलिसांनी त्यांचे कपडे ताब्यात घेऊन कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. पीडित महिलेला सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. आरोपींपैकी सात जणांना शुक्रवारपर्यंत (ता. 4) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अन्य एकाला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: Gane rape in Mumbai; Seven arrested