कागदापासून बनविलेल्या गणेशमूर्ती बाजारात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पर्यावरण संवर्धनासाठी होत असलेल्या जनजागृतीमुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मागणी वाढत आहे. त्यामुळे यावर्षी शाडूच्या मूर्तीबरोबर कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्ती बाजारात आल्या आहेत.

मुंबई : महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी होत असलेल्या जनजागृतीमुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मागणी वाढत आहे. त्यामुळे या वर्षी शाडूच्या मूर्तीबरोबर कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्ती बाजारात आल्या आहेत. त्या पूर्णपणे पर्यावरणपूरक असल्याचा दावा मूर्तिकारांनी केला आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी सरकारकडून वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी वृक्षारोपण, संवर्धन, प्लास्टिक बंदीसारखी उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीपेक्षा शाडूच्या मूर्तीची मागणी भक्तांकडून वाढली आहे. याशिवाय बाप्पाच्या सजावटीतही इकोफ्रेंडली साहित्याचा वापरही होऊ लागला आहे. त्यामुळे या वर्षी शाडूबरोबर कागदी मूर्तीही आल्या आहेत. वाशी येथील कन्नड भवन येथे श्री सद्‌गुरू कृपा आर्टस्‌चे पंकज घोडेकर आणि रूपेश फुलसुंदर यांनी या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. असे मुर्तीकार रुपेश फुलसंदर यांनी सांगितले.

किमतीत दहा टक्‍क्‍यांनी वाढ
रंग, शाडू मातीचे दर तसेच दळणवळण खर्च वाढल्याने यंदा मूर्तीच्या किमतीत वाढ झाली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या एक ते दोन फुटांपर्यंतच्या मूर्तींना दोन ते चार हजार रुपये; तर शाडूच्या मूर्तीना तीन ते सहा हजार रुपये आणि कागदापासून बनवलेल्या मूर्तीना अडीच ते पाच हजार रुपये दर आहेत. 

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कमी आणल्या असून, शाडूच्या व कागदापासून बनवलेल्या मूर्ती मोठ्या प्रमाणात मागवल्या आहेत. या मूर्तींची उंची एक ते दोन फुटांपर्यंत आहे. 
- रूपेश फुलसुंदर, मूर्तिकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh idol made from paper in the market