ऐरोलीतून गणेश नाईकांचा उमदेवारी अर्ज दाखल

ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने गणेश नाईक यांनी उमदेवारी अर्ज दाखल केला
ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीने गणेश नाईक यांनी उमदेवारी अर्ज दाखल केला

नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमदेवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने गणेश नाईक यांनी शुक्रवारी (ता.४) उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी गणेश नाईक यांच्या वतीने ऐरोली सेक्‍टर ६ येथील माजी आमदार संदीप नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून ते ऐरोली विभाग कार्यालयापर्यंत प्रचार रथावर स्वार होऊन ढोल-ताशांच्या निनादात शक्तिप्रर्दशन करत मिरवणूक काढण्यात आली. सुमारे दीड तास ही मिरवणूक सुरू होती. या रॅलीमध्ये माजी आमदार संदीप नाईक, आमदार रमेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक, महापौर सागर नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आदी नेते उपस्थित होते. मात्र, महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांच्या रॅलीत काही शिवसैनिकांनी गैरहजर राहत सावध पवित्रा घेतला असल्याचे दिसून आले. गणेश नाईक यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे गणेश शिंदे, मनसेच्या वतीने नीलेश बाणखेले, वंचित आघाडीच्या वतीने प्रकाश ढोकणे यांनी अर्ज दाखल केला.

ऐरोली विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संदीप नाईक यांना भाजपच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती; तर बेलापूर विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांना उमेदवारी न देता मंदा म्हात्रे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने गणेश नाईकांचा पत्ता कट झाला होता. मात्र, पुत्र संदीप नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांनी आग्रह धरत गणेश नाईक यांना रिंगणात उतरण्याची गळ घातली. त्यामुळे गणेश नाईक यांनी शक्तिप्रर्दशन करत शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ऐरोली व बेलापूर या दोन्ही जागा भाजपला गेल्यामुळे शिवसेनेच्या गोट्यात अस्वस्थता पसरली होती. त्यामुळे ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईकांच्या विरोधात शिवसेनेचे नेते विजय नाहटा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहावे, असे शिवसैनिकांचे म्हणणे होते. मात्र, विजय नाहटा यांनी उभे राहणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर, नवी मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक शिवराम पाटील हे उमेदवारी अर्ज भरताना गणेश नाईक यांच्यासोबत उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांनी पक्षाचा आदेश असताना युती धर्म पाळत गणेश नाईकांच्या रॅलीत उपस्थित राहावे, असे आवाहन केले असतानादेखील त्याकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. 

यांनी भरले उमेदवारी अर्ज
१. गणेश नाईक, भाजप-शिवसेना महायुती.
२. गणेश शिंदे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी.
३. निलेश बाणखेले, मनसे.
४. प्रकाश ढोकणे, वंचित बहूजन आघाडी.

ऐरोलीत वाहतूक कोंडी
गणेश नाईक यांची दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ऐरोली सेक्‍टर ६ येथून अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीमुळे ऐरोली सेक्‍टर ५ पासून सेक्‍टर ३ पर्यंतच्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रचार रॅलीची सुरुवात झाल्यांनतर ऐरोली सेक्‍टर ५ कडून ३ कडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक वळवण्यात आली होती; तर पोलिसांचीदेखील वाहतूक कोंडी सोडवताना दमछाक झाली होती.

ऐरोली डेपोत बेकायदेशीर पार्किंग
ऐरोली सेक्‍टर ३ येथील निवडणूक कार्यालयाच्या जवळ पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने उमदेवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी ऐरोली डेपोला पार्किंग प्लाझा करून टाकला होता. ऐरोली डेपोमध्ये पार्किंग करण्यात आल्यामुळे बस चालवणाऱ्या वाहनचालकांनादेखील याची डोकेदुखी ठरली होती; तर डेपोतील पार्किंगमुळे कोंडीत भर पडली होती.

संदीप नाईक यांना भाजपने उमेदवारी दिली होती; तर ती त्यांनीच लढवावी अशी इच्छा होती. मात्र, संदीप नाईक यांनी मला निवडणुकीत उभे राहावे, अशी इच्छा व्यक्त केली. संदीप नाईक यांच्या इच्छेखातर निवडणुकीत उभा राहिलो आहे. संदीप नाईकांना तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्ट्रिक मारण्याची संधी होती. मात्र, त्यांनी मला उमेदवारी दिली. बापाचा वारस हा मुलगा होता; पण राज्यातील राजकारणामध्ये पहिलीच घटना असेल, त्यांनी मुलाच्या ठिकाणी बाप वारस होतो; तर युतीमध्ये कोणतेच रुसवे फुगवे नसून, बंड होणार नाही.
- गणेश नाईक, उमेदवार, भाजप-शिवसेना महायुती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com