मुसळधार पावसाची गणेश मूर्तिकारांना धास्ती

शर्मिला वाळुंज
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पावसाच्या हाहाकाराने जनजीवन विस्कळित झालेले असताना या पावसाचा मोठा फटका गणेश मर्तिकारांना व विक्रेत्यांना बसल्याचे समोर आले आहे. पावसामुळे बनविलेल्या मूर्तींची नासधूस होण्याची धास्ती, मूर्ती सुकविण्यासाठी तसेच रंगरंगोटी केल्यानंतरही ते रंग सुकवण्यासाठी आता दिवसरात्र कष्ट घ्यावे लागणार  आहेत

ठाणे : पावसाच्या हाहाकाराने जनजीवन विस्कळित झालेले असताना या पावसाचा मोठा फटका गणेश मर्तिकारांना व विक्रेत्यांना बसल्याचे समोर आले आहे. पावसामुळे बनविलेल्या मूर्तींची नासधूस होण्याची धास्ती, मूर्ती सुकविण्यासाठी तसेच रंगरंगोटी केल्यानंतरही ते रंग सुकवण्यासाठी आता दिवसरात्र कष्ट घ्यावे लागणार, आदी प्रश्न मूर्तिकारांसमोर आहेत; परंतु गणपती हा विघ्नहर्ता असून तो आमची यातून नक्कीच सुटका करेल, असा विश्वास बाळगून मूर्तिकार जोमाने कामाला लागले आहेत.

ठाणे व आसपासचा परिसर जलमय झाल्याचेच चित्र होते. पावसामुळे घरे पाण्याखाली गेली असताना गणपती कार्यशाळाचालक आणि कामगार बनवलेल्या मूर्तींचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम करीत होते. शाडूच्या मातीपासून बनविलेल्या मूर्तींची पावसामुळे नासधूस होण्याची धास्ती असल्याने त्यांना प्लास्टिकच्या पिशव्यांचे आवरण घातले जात होते. पावसाचा जोर काहीसा जास्तच असल्याने शनिवार-रविवार बहुतांश कारखाने बंदच ठेवण्यात आले. यात मात्र मूर्तींना इजा पोहोचू नये म्हणून विशेष खबरदारीही घेण्यात आली.  

पावसाळ्याचे दिवस असल्याने या दिवसांत मूर्ती सुकत नाहीत. त्यामुळे काही कारखानदारांनी आधीपासूनच कारखान्यात मूर्ती सुकवण्यासाठी विविध गोष्टींची तरतूद करून ठेवली असल्याचे काही मूर्तिकारांनी सांगितले.

हॅलोजन, सुके गवत, कोळशाचा वापर
पावसाने उघडिप दिली असली, तरी ढगाळ वातावरणात पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने मूर्ती सुकत नाहीत. अशा वेळी मोठ्या हॅलोजन बल्बचा वापर केला जातो. तसेच सुके गवत, कोळसाही वापरला जातो. गवत, स्टोव्ह पेटवून त्यावर मूर्ती सुकविल्या जातात.

महिन्याभरावर गणेशोत्सव आला असून काही मूर्ती तयार आहेत, तर काहींवर अजूनही रंगकाम सुरू आहेत. पावसाने काही मूर्तींनी ओल पकडले असून ओल्या मूर्तींवर रंगकाम केल्यास ती रंग खेचून घेते व त्याची चमक कमी होते. त्यामुळे मूर्ती पूर्ण सुकल्याशिवाय रंगकाम करता येत नाही. 
- दिनेश गिरम, मूर्तिकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh sculptors fearful of torrential rains