Ganesh Utasav 2023 : रायगडात पुन्हा झाले गणेशाचे आगमन !

Ganesh Utasav 2023: 2 आँक्टोबरला साखरचौथ गणेशोत्सव
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Sakal

Ganesh Utasav 2023 : भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या म्हणजेच २ ऑक्टोबरला साखरचौथ गणेशाचे (गौरा गणपती) आगमन होत आहे. जिल्ह्यात साखरचौथीच्या सुमारे ६०० गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेशमूर्तीसाठी भक्तांची तयारी सुरू आहे.

गणेशोत्सव म्हणजे भक्तीचा जल्लोष. या कालावधीत घराघरांतील वातावरण मंगलमय झालेले असते. गोडधोडाचा प्रसाद, मोदकांचे असंख्य प्रकार, सुबक व सुंदर आरास त्यात विराजमान झालेले गणराय, घरभर दरवळणारा धूप-अगरबत्त्यांचा सुगंध आणि त्यात म्हटल्या जाणाऱ्या सवाद्य आरत्या. यामुळे घरासह आजूबाजूच्या परिसरातही नवचैतन्य संचालेले असते. अनंत चतुर्दशीला पुढच्या वर्षी लवकर या... म्‍हणत भक्‍तांनी गणरायाचा साश्रूनयनांनी निरोप दिला. आता जिल्ह्यात पुन्हा विघ्‍नहर्त्याचे आगमन होणार आहे. याला साखरचौथ गणेश म्हणतात.

साखरचौथीच्या गणपतीच्या प्रथेला कोणताही लिखित व शास्त्रीय आधार मिळत नाही. कोणतीही पौराणिक कथा यामागे आढळून येत नाही; परंतु वर्षानुवर्षे परंपरा सुरू आहे. गणेशाच्या प्रतिस्थापनेसाठी सहसा पितृपक्षाचा विचार केला जात नाही. पूर्वी हे गणपती दीड दिवसाचे होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून काही ठिकाणी या गणपतीची स्थापना अडीच व पाच दिवसही करण्यात येते. ज्यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी काही कारणास्तव गणेशमूर्ती आणणे शक्य नसते, त्यांच्यासाठी साखर चौथीच्या गणपतीचा पर्याय स्वीकारला जातो.

साखरचौथीच्या गणपतीची स्थापना मुख्यत्वे गणपती कारखानदार व कामगार पूर्वी करत असत. भाद्रपदाच्या गणपती विक्रीसाठी पेणच्या बाहेर त्यांना मुक्कामाला जावे लागत असल्याने अनेक कारखानदार व नोकरदारांना आपल्या घरातील तसेच सार्वजनिक गणेशोत्सवात भाग घेता येत नव्हता. त्यामुळे साखरचौथीच्या गणपतीची संकल्पना रायगडमध्ये अस्तित्वात आली असावी, असे मानले जाते. परंतु आता जिल्ह्यात साखरचौथीच्या गणेशोत्सवालाही मोठे स्वरूप व महत्त्व प्राप्त झाले आहे.

विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालल्याने प्रत्येकाला हौस म्हणून घरी गणपती आणावासा वाटतो. मूळ कुटुंबात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती असल्यामुळे हा उत्सव झाल्यानंतर साखरचौथीच्या दिवशी अनेक जण आपल्या घरात गणपतीची प्रतिस्थापना करतात. गणेश चतुर्थीच्या काळात जर घरात काही दुर्घटना घडली वा सुतक आले तर ते संपल्यावर त्यावर्षी साखरचौथीच्या दिवशी पर्याय म्हणून गणपतीची स्थापना करतात.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Visarjan 2023: अमेरिकेतील डेट्रॉईट शहरात मराठीजनांचा गणरायाला निरोप

पूजाअर्चा

साखरचौथ गणपतीची प्रतिस्थापना गणेश चतुर्थीच्या विधीप्रमाणेच केली जाते. गणेश चतुर्थीला गुळातील मोदक करतात. परंतु साखरचौथला बापाचे आवडते मोदक हे साखरेच्या सारणाचे केले जातात. आरती करताना ताट तसेच ताम्हणाऐवजी मोठी परात वापरली जाते. प्रथम चंद्राला ओवाळून मग गणपतीची आरती केली जाते. साखरेचे २१ मोदक, ५ दिवे, काकडीच्या गोल चकत्या केळं ताटात ठेवून ही आरती होते.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Visarjan 2023: हजारो क्विंटल गुलालाची उधळण करीत लाडक्या बाप्पाला जल्लोषात निरोप

साखरचौथचे वाढते प्रस्थ

साखरचौथीच्या गणेशाची प्रतिस्थापना जिल्ह्यातील पनवेल, उरण, पेण व अलिबाग या तालुक्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते; आता हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात हे वातावरण निर्माण होत आहे. महाडमध्ये माजी आमदार माणिक जगताप संस्थापक असलेल्या लोकविकास सामाजिक संस्थेकडूनही सात वर्षांपासून साखरचौथ गणेशोत्सव सुरू आहे. या वर्षीही वीरेश्वर मंदिरामध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे. मुरूड मजगाव, पेण, कुरूळ, कुरूळ नाका, श्रीबाग, रोहा, सानेगाव, श्रीवर्धन, दांडा, पाच रस्ता, नांदगाव, पळस, अष्टमी, रेवदंडा या भागांमध्ये दर वर्षीप्रमाणे साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जात असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Visarjan 2023: गणपती निघाले गावाला...चैन पडेना आम्हाला! गणरायाला वाजत- गाजत निरोप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com