आता पंचगव्य मूर्तींना गणेशभक्तांची पसंती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मुंबई - प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची चळवळ सुरू करण्यात आली आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तींचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचबरोबर पंचगव्यापासून तयार केलेल्या ‘श्रीं’च्या मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत.

गणेशोत्सवाला महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. बाजारांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस, शाडू आणि कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींसोबतच शेणापासून बनवलेल्या मूर्तीही आल्या आहेत. पंचगव्यापासून बनवलेल्या या मूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्या पर्यावरणपूरक असून वजनालाही हलक्‍या आहेत. गोमूत्र, शेण, दूध, तूप, ताक या पदार्थांनी या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. मुंबई परिसरात मिळणाऱ्या बहुतेक पंचगव्य मूर्ती गुजरातच्या राजकोट येथील गोशाळेत बनवण्यात येतात. या मूर्तीचे घराच्या परिसरातच विसर्जन करणे शक्‍य आहे. कागदी लगद्यापासून बनवलेल्या  मूर्ती हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे पंचगव्यापासून बनवलेल्या मूर्तींना मागणी वाढत आहे. 

गतवर्षी ६६ मूर्ती विकल्या गेल्या होत्या. या वर्षी ४५० मूर्तीची ऑर्डर नोंदवण्यात आली आहे, असे मुंबईतील मूर्ती विक्रेते जयंत मारू यांनी सांगितले. 

एक ते तीन फुटांपर्यंत पंचगव्य मूर्ती उपलब्ध आहेत. रंगकामाशिवाय असलेल्या या मूर्तींची किंमत ७०० ते एक हजार रुपये आहे, तर नैसर्गिक रंग दिलेल्या मूर्तींची किंमत जास्त आहे. राजकोटमधील महिला बचत गटाला या मूर्ती तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते.
- जयंत मारू, मूर्ती विक्रेते

Web Title: Ganesh worshipers like Panchgavya idols