Mumbai Ganpati Visarjan : १० हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष; अनंत चतुर्दशी दिनी गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिका सज्ज

१० हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष, १९८ कृत्रिम तलाव आदी सुविधा
Ganpati Visarjan Tank
Ganpati Visarjan TankSAKAL

मुंबई - अनंत चतुर्दशी दिनी मोठ्या भक्तीभावाने गणेश मूर्ती विसर्जनासाठी गुरुवारी (ता. २८) होणा-या गणेशमूर्ती विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. पालिका प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे.

विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी महानगरपालिकेचे सुमारे १० हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण १९८ कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था आहे, अशी माहिती उप आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.

मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किना-यांवर ४६८ स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४६ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ७६४ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत. विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले आदी निर्माल्य जमा करण्यासाठी १५० निर्माल्य कलशांसह २८२ निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली असल्याचे उपायुक्त बिरादार यांनी सांगितले.

पालिकेच्या विविध खात्यातील कर्मचा-यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने ६० निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ६८ स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाकडून ७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६१ रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’ च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी सुमारे १,०८३ फ्लडलाईट आणि २७ सर्चलाईट लावले आहेत.

विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी १२१ फिरती प्रसाधनगृहं सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्य़ात आले.

लालबागच्या राजाचा विसर्जन मार्ग

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरणूकीची तयारी सकाळ 11 वाजलेपासून सुरू होईल. लालबागमधून विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाल्यानंतर भारतमाता तिथून युटर्न, चिंचपोकळी, भायखळा रेल्वे स्थानक, गोल देवूळ, सरदार वल्लभभाई पटेल मार्गे गिरगाव चौपाटी या दरवर्षीच्या मार्गाने लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक निघेल.

गणेशगल्लीचा राजा, तेजूकाया, चितामणी, रंगारी बदक चाळीचा गणपती या प्रसिध्द गणपतींच्या विसर्जन मिरवणूका आकर्षण असेल. मंगलमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी लक्षात घेवून गर्दीचे नियोजन पोलिसांनी केले आहे.

- समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.

- मूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.

- अंधार असणा-या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाणे टाळावे.

- महानगरपालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.

- समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवरक्षकांना कळवावे.

- अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

- भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.

- अनंत चतुर्दशीच्या दिवशी भरती आणि ओहोटीवेळी नागरिकांनी काळजी घ्यावी

- यंदा अनंत चतुर्दशी दिवशी समुद्रात सकाळी ११ वाजता ४.५६ मीटरची भरती, सायंकाळी ५.०८ वाजता ०.७३ मीटरची ओहोटी, रात्री ११.२४ वाजता ४.४८ मीटर उंचीची भरती असेल. नागरिकांनी सतर्क राहावे.

- मत्स्यदंशापासून बचाव करा, वेळीच प्रथमोपचार घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com