ठाण्यात गणेशोत्सव मंडळाचा "फिक्‍स' वर्गणीचा ट्रेंड 

वर्गणी गोळा करताना जय बजरंग मंडळाचे कार्यकर्ते.
वर्गणी गोळा करताना जय बजरंग मंडळाचे कार्यकर्ते.

ठाणे : सध्याच्या काळात बाजारीकरणामुळे "फिक्‍स रेट'चे सूत्र सर्वत्र वापरले जाते. यंदा मात्र गणेशोत्सव मंडळांनीही "फिक्‍स वर्गणी'चा नवा ट्रेंड सुरू केला आहे. जुलै महिना संपत आला की गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते घरोघरी फिरून वर्गणीची रक्कम गोळा करायला सुरुवात करतात. अनेक वेळा गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते वर्गणी गोळा करतात की खंडणी मागतात, हेच कळायला मार्ग नसतो. मात्र, ठाण्यातील वागळे इस्टेट येथील जय बजरंग बाल मित्र मंडळाने याला छेद देत वर्षातील सर्व उपक्रमासाठी 251 रुपये आकारण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. 

दरवर्षी वर्गणीचे आकडे वाढवण्याची परंपरा काही मंडळांकडून राबवली जाते. गेल्या वर्षी 501 दिले होते, यंदा 1101 द्या, पुन्हा पुढे 2202 द्या... असा सूर लगावणाऱ्या कार्यकर्त्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी नागरिक तेथून पळ काढतात. महागाई, सजावटीसाठीचा वाढलेला खर्च, प्रसाद आणि समाजोपयोगी उपक्रम, स्पर्धा, विद्यार्थ्यांचे गुणगौरव, पर्यावरणपूरक सजावटी करायची म्हणजे पैसे तर लागणारच ना? असा या वर्गणी मागणाऱ्या कार्यकर्त्यांचा दावा असतो. 

परंतु ठाण्यातील वागळे इस्टेट येथील जय बजरंग बाल मित्र मंडळ दरवर्षी अवघे 251 इतकी वर्गणी घेऊन सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवतात. त्यामुळेच हे मंडळ गेल्या पाच वर्षांपासून आपली एक वेगळी ओळख राखून आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातील गणेशोत्सव, दहीहंडी, होळी, पदयात्रा अशा काही निवडक सणांसाठी प्रत्येक घरातून किमान 251 रुपये वर्गणी गोळा केली जाते. त्यामुळे येथील रहिवासी स्वतःहून मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे वर्गणी जमा करतात, अशी माहिती मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते अभिजीत सावंत यांनी दिली. 

सामाजिक जाणीवचेही भान... 
सण-उत्सव साजरे करताना त्यातील प्रत्येक घटकापर्यंत या आनंदाची शिदोरी पोहोचविण्यासाठी हे मंडळ प्रयत्नशील असते. दरवर्षी सत्यनारायण पूजेऐवजी अनाथ मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. यंदा महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतकार्य करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणात रहिवासी मदत करतील, अशी आशा अभिजीत सावंत यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

मंडळाचे एकूण 300 सभासद असून त्यापैकी 80 ते 100 कमावते सभासद आपल्या मंडळासाठी दरवर्षी 1001 किंवा त्याहून अधिक वर्गणी गोळा करतात. सण0उत्सव हे समाजात आनंद देण्यासाठी साजरे केले जातात. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी मंडळ घेते. 
-अभिजीत सावंत, 
जय बजरंग मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com