घोडबंदर रोडवर टकटक टोळीचा सुळसुळाट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

घोडबंदर रोडवर सध्या टकटक टोळीचा सुळसुळाट वाढला आहे. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या कारचालकांना सिग्नलला अथवा वाहतूक कोंडीत गाठून कारच्या काचेवर "टकटक' करीत लूट करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

 

ठाणे : घोडबंदर रोडवर सध्या टकटक टोळीचा सुळसुळाट वाढला आहे. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या कारचालकांना सिग्नलला अथवा वाहतूक कोंडीत गाठून कारच्या काचेवर "टकटक' करीत लूट करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील महिनाभरात तब्बल सात कारचालकांना या टकटक टोळीतील भामट्यानी लुबाडल्याच्या घटना घडल्या आहेत. दोघे भामटे कारचालकांचे लक्ष विचलित करून कारमधील मोबाईल अथवा किमती ऐवजाच्या बॅगा लंपास करीत असल्याने कारचालक धास्तावले आहेत. 

मंगळवारी सायंकाळीदेखील या टकटक टोळीने तिघा कारचालकांचे महागडे मोबाईल लांबवल्याच्या घटना घडल्या. तेव्हा घोडबंदर रोडवर खासगी वेशातील पोलिसांनी गस्त वाढवून या भामट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरीत आहे. मिरारोड पूर्वेकडे राहणारे दीपक मजिठिया हे मंगळवारी डोंबिवलीहून कारने येत असताना सायंकाळी घोडबंदर रोडवरील कापूरबावडी सिग्नलजवळ वाहतूक कोंडी झाली. या वेळी कारच्या काचेवर टकटक करून एका भामट्याने गाडीचे चाक पायावरून गेल्याचे सांगत भांडण उकरून काढले. त्याच वेळी पहिल्या भामट्याच्या साथीदाराने दुसऱ्या बाजूकडून काचेवर जोरजोरात टकटक करीत लक्ष विचलित केले. तेव्हा, संधी साधून पहिल्या भामट्याने गाडीतील 10 हजारांचा मोबाईल लांबवला. 

अशीच घटना ब्रह्मांड सिग्नलजवळ घडली. कासारवडवली येथे राहणारे प्रदीप अनंत शिंदे सायंकाळी कारने घरी परतत असताना भामट्यांनी अशाच प्रकारे लुबाडले. यात शिंदे यांचा 20 हजारांच्या मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारला; तर तिसऱ्या घटनेत घोडबंदर रोडवरील प्राजक्ता नाईक या ऐरोली ते घोडबंदर रोडमार्गे सायंकाळी घरी परतत असताना 5 वाजण्याच्या सुमारास माजिवडा सिग्नलजवळ दोघा भामट्यांनी लक्ष विचलित करीत त्यांचा 25 हजारांचा मोबाईल घेऊन धूम ठोकली. वरील तिन्ही गुन्ह्यांप्रकरणी चितळसर आणि कापूरबावडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस परिसरातील सीसी टीव्ही फुटेज आणि मोबाईल ट्रॅकिंगद्वारे चोरट्यांचा माग काढत आहेत. 

असा आहे चोरीचा फंडा 
घोडबंदर रोडवर सिग्नलला अथवा कोंडीत वाहनांचा वेग कमी असताना अचानक कुणीतरी तुमच्या कारजवळ येऊन काचेवर टकटक करतो. तसेच, तुमच्या कारचे चाक पायावरून गेले... तुमच्या कारची धडक बसली... अशी बतावणी करून भांडण उकरून काढतो. लागलीच भामट्याचा दुसरा साथीदार कारच्या दुसऱ्या बाजूकडून काचेवर टकटक करून लक्ष विचलित करतो. त्यानंतर पहिला भामटा गाडीतील सीटवर ठेवलेला किमती ऐवज घेऊन पसार होतो. तोपर्यंत दुसरा भामटा कारचालकाशी भांडत असतो. सीटवरील सामान गायब झाल्याचे लक्षात येईपर्यंत दोघेही भामटे वाहनांच्या गर्दीतून पसार होतात. अशी या चोरट्यांची मोडस ऑपरेंडी आहे. घोडबंदर रोडवरील सिग्नलला अथवा कोंडी होणाऱ्या नाक्‍यांवर दबा धरून बसलेले असतात. कारच्या सीटवर बॅग अथवा किमती सामान किंवा मोबाईल दिसले की, या टोळीचे ऑपरेशन सुरू होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A gang rammed on Ghodbandar Road