गॅंगस्टर एजाज लकडावालाच्या 'या' साथीदाराला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

बांधकाम व्यावसायिक व पदाधिकारी असलेल्या त्याच्या भावाला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गॅंगस्टर एजाज लकडावालाच्या साथीदाराला गुन्हे शाखेने अटक केली.

मुंबई : बांधकाम व्यावसायिक व पदाधिकारी असलेल्या त्याच्या भावाला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गॅंगस्टर एजाज लकडावालाच्या साथीदाराला गुन्हे शाखेने अटक केली. नदीम अब्दुल सत्तार लकडावाला (वय ४९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो खार (पश्‍चिम)चा रहिवासी आहे. 

लकडावालाने तक्रारदार आणि त्याच्या भावाला खंडणीसाठी धमकावल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली होती. याप्रकरणी नदीमने तक्रारदारांची माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लुकआउट नोटीसद्वारे आरोपीला विमानतळावरून अटक करण्यात आली. सध्या तुरुंगात असलेल्या एजाज लकडावालाच्या जबाबात नदीमचे नाव निष्पन्न झाले होते. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने त्याचा शोध घेतला असता तो परदेशात असल्याची माहिती मिळाली होती.

ही बातमी वाचा ः सामनातील संपादकीय मधल्या टिके नंतर चंद्रकांत पाटील म्हणतात रश्मी वहिनी...

त्यानुसार त्याच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. शनिवारी नदीम जेद्दाह येथून मुंबईत परत आला असता त्याला विमानतळावर ताब्यात घेतले. याबाबतची माहिती खंडणीविरोधी पथकाला दिली. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाने त्याला विमानतळावर अटक केली. तक्रारदार हे भाजपचा पदाधिकारी व वक्‍फ बोर्डचे सभासद आहेत.

तसेच, त्यांच्या भावासोबत भागीदारीत बांधकाम व्यावसायिक आहेत. तक्रारदारासह त्यांच्या भावालाही लकडावालाने खंडणीसाठी दूरध्वनी केले होते, तसेच संदेशही पाठविले होते. त्यात अनेक पदाधिकाऱ्यांची नावे पाठवून त्यांना आपणच मारल्याचे सांगितले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangster Ejaz Lakdawala's partner arrested