घारापुरी बेटावर रोज रात्री जाळला जातोय कचरा

सुजित गायकवाड
मंगळवार, 15 जानेवारी 2019

नवी मुंबई - मुंबई आणि नवी मुंबईतील समुद्रात अगदी मध्यभागी वसलेल्या जागतिक दर्जाच्या घारापुरी बेटावर समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या कचऱ्याने धोका निर्माण झालेला असताना या कचऱ्यासह बेटावरील तीन गावांचाही कचरा जाळला जात असल्याने घारापुरीचे पर्यावरण धोक्यात आले आहे. जंगलात रात्री हा कचरा जाळला जात असल्याने वनसंपदाही धोक्‍यात आली आहे. 

नवी मुंबई - मुंबई आणि नवी मुंबईतील समुद्रात अगदी मध्यभागी वसलेल्या जागतिक दर्जाच्या घारापुरी बेटावर समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या कचऱ्याने धोका निर्माण झालेला असताना या कचऱ्यासह बेटावरील तीन गावांचाही कचरा जाळला जात असल्याने घारापुरीचे पर्यावरण धोक्यात आले आहे. जंगलात रात्री हा कचरा जाळला जात असल्याने वनसंपदाही धोक्‍यात आली आहे. 

सुमारे १० कि.मी.च्या परिघात डोंगररांगांत वसलेल्या घारापुरी बेटावर शेतबंदर, राजबंदर आणि मोरबंदर अशी तीन गावे आहेत. घारापुरी ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे या गावांचा कारभार चालतो. घंटागाडीतून गावांतील दैनंदिन कचरा गोळा केला जातो. पूर्वी पर्यावरणस्नेही व्यक्तीतर्फे या कचऱ्याची बेटापर्यंत मोफत वाहतूक करून व्हिल्हेवाट लावली जायची; मात्र नंतर सरकारी अनुदानातून या खतनिर्मिती करणाऱ्या यंत्राद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल, असे ग्रामपंचायतीने ठरवले; मात्र नोव्हेंबर २०१८ पासून बेटावर रोज रात्री कचरा जाळला आहे. 

शेतबंदर आणि राजबंदर गावातील जंगलात जाळलेल्या कचऱ्यामुळे काही मोठी झाडे आणि झुडपे खाक झाली आहेत. आगीमुळे धुराचे लोण गावात पसरत आहेत. सध्या शेतबंदर आणि मोरबंदर गावाच्या हद्दीत १० ते १२ टन कचरा गोण्यांमध्ये ठेवलेला आहे. तोही जाळला जाण्याची शक्‍यता ग्रामस्थांनी वर्तवली. याबाबत गावातील जयेश पाटील या तरुणाने राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ या पोर्टलवर तक्रारही नोंदवली होती; परंतु त्यावर ‘सरकारी उत्तरा’शिवाय काहीच झाले नाही. घारापुरी बेटावर पुरातन लेण्या आणि इंग्रजांच्या काळातील तोफा आहेत. त्या पुरातन खात्याच्या अखत्यारित आहेत. तसेच घारापुरीवरील दुर्मिळ जंगलावर वनखात्याचा अधिकार आहे; मात्र दोन्ही यंत्रणांकडून कचरा जाळला असल्याबाबत काहीच कार्यवाही होत नसल्याने स्थानिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

घारापुरी बेटावर शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी ठाण्यातील एका कंपनीला कंत्राट दिले आहे.  
- बळीराम ठाकूर,  सरपंच, घारापुरी ग्रुप ग्रामपंचायत. 

कचरा विल्हेवाटीबाबत प्रस्ताव सादर केला आहे. जंगलात कचऱ्याला आग लावली जात असल्याबाबत सरपंचांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. 
- अमित तपकिरे, ग्रामसेवक,

Web Title: The garbage is burning every night on the island of Gharapuri