गरज कचरासाक्षरतेची

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

मुंबई - घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील कंत्राटदार, जबाबदार यंत्रणांचे अधिकारी, राजकीय नेत्यांच्या अभद्र युतीमुळे राज्यात जागोजागी महाउकीरडे तयार होत असल्याच्या सद्यःस्थितीवर "सकाळ'ने टाकलेल्या प्रकाशझोतानंतर संबंधितांविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पर्यावरणाबरोबरच मानवी आयुष्याशीही खेळ खेळत आपल्या घरांतील तिजोऱ्या भरणाऱ्या या त्रिकूटावर हल्लाबोल करतानाच वाचकांनी या समस्येवर उपायही सुचवले आहेत. ही समस्या निकाली काढण्यासाठी यंत्रणांबरोबरच समाजातही कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भातील साक्षरता वाढीस लागण्याची गरज आहे. तसे झाल्यास महात्मा गांधींचे "स्वच्छ भारत'चे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल, असे मतही अनेक वाचकांनी नोंदवले.

कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात स्थानिक स्वराज संस्थांना येत असलेल्या अपयशामुळे मानवी आरोग्यासह पर्यावरणावरही होणाऱ्या विपरित परिणामांबाबत "सकाळ'ने दोन ऑक्‍टोबरच्या अंकात "कचऱ्यातून भ्रष्टाचाराचा धूर' या मथळ्याखाली आवाज उठवल्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया आणि सूचनांचा पाऊस पडण्यास सुरवात झाली. कचऱ्याच्या विल्हेवाटीवर खर्च होणारा कोट्यवधींचा निधी कुठे अन्‌ कसा झिरपतो, याची कल्पना होत असूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याबाबत वाचकांनी संताप व्यक्त केला.

तसेच कचऱ्याच्या समस्येबाबत तक्रारी नोंदवूनही संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा अनुभवही मांडला.
स्वीडन, नॉर्वेसारखी छोटी राज्ये, सिंगापूरसारखी आधुनिक शहरे कचरा व्यवस्थापनासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरतात. तेथे सर्व प्रकारच्या कचऱ्याचे विकेंद्रीकरण करून त्यापासून खत-वीजनिर्मितीसारख्या प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी होते. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सिंगापूरमध्ये 93 लाख डॉलर खर्चून प्रकल्प उभारला जात असताना भारतात मात्र पुतळे-स्मारके उभारण्यासारख्या निरुत्पादक बाबींवर कोट्यवधींची उधळण होते, याबाबतही वाचकांनी खेद व्यक्त केला.

वाचकांनी सुचवलेले उपाय
- ओला-सुक्‍या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करण्यात यावे
- ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करून ते शेतकऱ्यांना द्यावे
- कचऱ्याचा वापर रस्तेबांधणीसाठी होऊ शकतो का, यावर अभ्यास व्हावा
- कचऱ्यातील प्लॅस्टिक वितळवून त्यापासून ठिबक सिंचनासाठी लागणारे साहित्य तयार करावे.

प्रतिक्रिया
जागोजागी भरून वाहणाऱ्या कचराकुंड्या म्हणजे आजारांना आमंत्रणच! शहरातील मटणांच्या दुकानांतील घाण नाल्यांमध्ये टाकली जाते. ते सडून त्याची दुर्गंधी सर्वदूर पसरते. या घाणीचे व्यवस्थापन कोण करणार? जलसाक्षरतेसारखी "कचरा साक्षरते'ची वेळ आली आहे.
- प्रदीपकुमार उजेगर, बीड

नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण, पुनरुत्पादन आणि विल्हेवाटीसंदर्भात योग्य प्रशिक्षण मिळेपर्यंत हा प्रश्‍न सुटणार नाही.
- डॉ. किशोर कदम, उस्मानाबाद

स्वीडन, नॉर्वेसारखी छोटी राज्ये, सिंगापूरसारखी लहान शहरे सर्व प्रकारच्या, घातक कचऱ्याचे उत्तम नियोजन करतात. आधुनिक यंत्रांद्वारे घरगुती कचऱ्याचे विकेंद्रीकरण करता येते. त्यापासून मिथेन वायू, वीज, खते बनवता येतात. सर्व प्रकारच्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.
- डॉ. स. ग. पटवर्धन, महाड

नागरिकांना स्वच्छतेची सवय लावणे महत्त्वाचे आहे. तसे झाल्यास सर्व प्रश्‍न सुटतील.
- सुरेश धुरी, जोगेश्‍वरी

Web Title: Garbage Issue Literacy