कचऱ्याचे प्रमाण कमी होतेय - महापौर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबई - कचऱ्याचे प्रमाण कमी होत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत मुंबई सजग होतेय. त्यामुळेच मुंबई शहरात निर्माण होणारा नऊ हजार मेट्रिक टन कचरा आता सात हजार मेट्रिक टनावर आला आहे. गृहनिर्माण सोसायट्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत सहकार्य करत आहेत. मुंबईला मिळालेला स्वच्छ राजधानीचा मान हे सफाई कामगार व अधिकाऱ्यांचे श्रेय आहे, असे गौरवोद्‌गार महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी काढले.

केंद्र सरकारकडून "स्वच्छता सर्वेक्षण' स्वच्छ राजधानीचा मान मुंबईला मिळाल्याबद्दल महापौर म्हणाले की, पालिकेच्या सफाई कर्मचारी, अधिकारी यांनी मुंबई स्वच्छ राखण्यासाठी अपार कष्ट घेतले आहेत. सर्वपक्षीय नगरसेवकांनीही त्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती महापौर महाडेश्‍वर यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिली. मुंबई महापालिका करीत असलेल्या स्वच्छता कामात शंभर टक्‍के यशस्वी झालो नसलो तरी जनतेच्या सहकार्याने भविष्यात सर्व स्तरांवर प्रथम येऊ, असा आशावाद त्यांनी व्यक्‍त केला. देशात स्वच्छतेचा मान मिळाल्याबद्दल पालिका कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे आपले कर्तव्य आहे. मुंबईला केंद्राने दिलेल्या या पुरस्काराबाबतचे श्रेय शिवसेना घेत नसल्याचे ते म्हणाले.

Web Title: garbage percentage less mayor