'कचरा टाका बक्षीस मिळवा'

'कचरा टाका बक्षीस मिळवा'

मुंबई- स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहराची प्रतिष्ठा आणि गुणांकन वाढवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाद्वारे नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात.या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचा कचरा आणि प्लास्टिक संकलन करता यावे यासाठी ठाण्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक कचरापेट्या (टेकबिन) बसवण्यात आल्या आहेत. या टेकबिनचे वैशिष्ट्य म्हणजे यात कचरा टाकणाऱ्या नागरिकांना मोफत कुपन मिळणार असून त्याद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकता येणार आहेत.

ठाणे महापालिकेसाठी पीपीपी तत्वावर राबविला जाणारा हा महात्वाकांक्षी उपक्रम मे. एशियन गॅलन्ट फूड एलएलपी ही खाजगी संस्थेद्वारे विनामोबदला राबविला जात असून त्यांना या टेकबिनवर जाहिरात करण्याचे हक्क पालिकेने प्रदान केले आहेत. ठाणे शहरात दररोज सुमारे 700 टन कचरा निर्माण होत असून या कचऱ्याचे व्यवस्थापन नेटके व्हावे यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारे जनजागृती केली जाते.

त्याचबरोबर, दररोज प्रभागानिहाय कचरा उचलण्यासाठी शेकडो घंटागाडी आणि हजारोच्या संख्येने सफाई कर्मचारी तैनात केले आहेत. तरीही कचऱ्याची समस्या संपत नसल्याने पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यानुसार, पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कचरा टाकणाऱ्या नागरिकांसाठी “कचरा टाका बक्षीस मिळवा” असा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा भार पेलणाऱ्या मे. एशियन गॅलन्ट फूड या खाजगी संस्थेद्वारे शहरात तब्बल 100 टेकबिन (अत्याधुनिक कचरापेट्या) बसवण्यात आल्या आहेत. या टेकबिनमध्ये एकूण चार कप्पे असून त्यात ओला, सुका कचरा प्लास्टिक आणि ई कचरा (जनरल वेस्ट) टाकण्याची व्यवस्था केली आहे.

मोबाईल एप्लिकेशनच्या माध्यमातूनही सॅटीस, शहरातील बाजारपेठा, उद्याने व इतर महत्वाच्या ठिकाणी ठेवलेल्या टेकबिनची माहिती कचरा टाकणाऱ्या नागरिकांना मिळणार असून कचरा टाकल्यास बक्षीसही मिळणार आहे. या टेकबिनमध्ये गोळा झालेला कचरा नंतर कचरा गाडी अथवा मोठ्या पिशव्यामधून कचराभूमीकडे वाहून नेला जाणार आहे. या उपक्रमामुळे शहर स्वच्छ होईलच किंबहुना पालिकेच्या घनकचऱ्यावरील खर्चात बचत होईल, असा दावा मे.एशियन गॅलन्ट फूड या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित देवकर यांनी केला आहे.

टेकबिन काय आहे ?
काही वर्षापूर्वी लोणावळा येथे कचरा टाकल्यावर चॉकलेट मिळत असे. अशी यंत्रणा पाश्चात्य देशात आहे. त्याच धर्तीवर टेकबिन या अत्याधुनिक कचरापेटीची संकल्पना राबवली आहे. कचरा टाकल्यावर नागरिकांनी मोफत कुपनसाठी या कचरापेटीवरील क्यू आर कोड्स मोबाईलमध्ये स्कॅन करणे गरजेचे आहे. ही कुपन्स विविध दुकाने व आस्थापने आदी ठिकाणी वापरता येणार आहेत. त्याचबरोबर मेमरी डिस्प्ले स्कॅन करून आपल्याला मिळालेली कुपन्स दर्शवलेल्या ठिकाणी पाठवल्यावर अंतिम विजेत्याला आकर्षक पारितोषिक मिळणार आहे. या उपक्रमाचा खर्च टेकबिनवर केल्या जाणाऱ्या एलईडी,बॅकलीड जाहिरातीद्वारे मिळवण्याचे अधिकार सदर संस्थेला देण्यात आले आहेत.

वास्तविक शहर स्वच्छ ठेवणे ही एकट्या महापालिकेचीच जबाबदारी नाही तर,नागरिकांनीही शहर स्वच्छतेसाठी स्वतःपासून सुरूवात करायला हवी.पालिकेद्वारे विविध प्रकारे जनजागृती सुरूच असते,तरीही प्रथमच कचरा टाकण्यासाठी मोफत कुपन्स देण्याचे अभिनव प्रयोजन या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. -मनिषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण अधिकारी,ठामपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com