गेट बंद; भ्रष्टाचार खुलाच! 

गेट बंद; भ्रष्टाचार खुलाच! 

मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील त्रिमूर्ती स्थानकाजवळील प्रवेशद्वारावरून पर्यटकांना ऑफलाईन तिकिटांवर बेकायदा प्रवेश दिला जात असल्याचे "सकाळ'ने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड केल्यानंतरही उद्यान प्रशासन ताळ्यावर आलेले नाही. या उद्यानातील कर्मचाऱ्यांकडून लाखोंचा गैरव्यवहार होत असल्याचा पर्दाफाश "सकाळ'ने केल्यानंतर प्रशासनाने हे प्रवेशद्वार बंद केले. या प्रकाराच्या चौकशीसाठी प्रशासनाने समितीही स्थापन केली; मात्र त्रिमूर्ती प्रवेशद्वारावरून प्रवेश देणेच बेकायदा असल्याने त्याबाबत चौकशी झाल्यास प्रशासकीय यंत्रणाच अडचणीत येण्याची शक्‍यता असल्याने नौकाविहाराच्या तिकीट विक्रीचीच चौकशी ही समिती करणार आहे. त्रिमूर्ती प्रवेशद्वारावर बुधवारी झालेल्या तिकिटविक्रीची माहिती देण्यासही प्रशासन टाळाटाळ करत आहे. 

पर्यटकांची संख्या वाढत असतानाही उद्यानाचा महसूल घटत असल्याने तिकीट विक्रीत गैरव्यवहार होत असल्याचा संशय व्यक्त होत होता. "सकाळ'ने केलेल्या "स्टिंग ऑपरेशन'नंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्रिमूर्ती स्थानकाजवळील प्रवेशद्वारावरून केवळ मासिक पासधारक, तसेच स्थानिक आदिवासी कुटुंबांनाच प्रवेश देणे बंधनकारक असताना, ऑनलाईन तिकीट विक्री न करता प्रवेश तसेच नौकाविहारासाठी जुन्या ऑफलाईन तिकिटांवर नव्या दरांचा शिक्का मारून ते पर्यटकांना दिले जात असल्याचे "सकाळ'ने उघड केले होते. यासंदर्भात शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध होताच या प्रकाराच्या चौकशीसाठी उद्यान संचालक व मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांनी समिती स्थापन केली. 

हिशेब द्या! 
त्रिमूर्ती स्थानकानजीकच्या प्रवेशद्वारावरून बेकायदा प्रवेश दिला जात असल्याने त्यातून मिळणाऱ्या महसुलाची नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे इतर चार ठिकाणी होणाऱ्या तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाची माहिती उद्यान प्रशासन देते. त्रिमूर्ती प्रवेशद्वारावर होणाऱ्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती देण्यात मात्र टाळाटाळ केली होती. या पार्श्‍वभूमीवर महसुलाच्या अधिकृत नोंदीतून गायब झालेले पैसे उद्यान प्रशासनाने समोर आणावेत, अशी मागणी राज्य वन्यजीव बोर्डाचे सदस्य आणि वन्यजीव जैविकशास्त्रज्ञ अनिश अंधेरिया यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com