वास्तू दिमाखदार; पण पर्यटक बेजार!

Gate-Way-of-India
Gate-Way-of-India

मुंबई - ब्रिटिश वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले मुंबईचे प्रवेशद्वार अर्थात ‘गेटवे ऑफ इंडिया’ची दिमाखदार भव्यदिव्य वास्तू पाहून पर्यटक सुखावून जातो. ‘गेटवे’च्या परिसरात आल्यावर फेसाळणारा समुद्र आणि पंचतारांकित ताजमहाल हॉटेलच्या सान्निध्यात तो हरखून जातो. मात्र, आजूबाजूला टॅक्‍सी चालकांकडून होणारी लूट आणि फेरी बोट चालकांकडून होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनामुळे तो बेजार झाला आहे. त्यांच्या सोयी-सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन काहीच कार्यवाही करत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

गेटवे ऑफ इंडिया भारतातील २० व्या शतकात बांधली गेलेली एक पुरातन वास्तू आहे. गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी ३१ मार्च १९११ रोजी करण्यात आली. जॉर्ज विटेटची अंतिम रचना १९१४ मंजूर झाली आणि गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम १९२४ मध्ये पूर्ण करण्यात आले. भारत भेटीला आलेले इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात गेट वे प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली. मुंबईतील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. आजही ती आपला शान राखून असली तरी पर्यटनाच्या नावाने तिथे लूट सुरू आहे. 

मुंबईत आलेल्या प्रत्येक पर्यटकाची पहिली पसंती गेटवे ऑफ इंडियासमोर छायाचित्र काढायला असते. विविध सुट्ट्यांचे औचित्य साधत गेटवे ऑफ इंडियावर विविधरंगी रोषणाई केली जाते. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम गेटवे ऑफ इंडियाजवळ केले जातात. तिथे दिग्गज गायकांची मैफल ऐकणे म्हणजे मुंबईकरांसाठी पर्वणीच असते. सध्याही दिवाळी सुट्टीचा हंगाम असल्याने गेटवे ऑफ इंडियाला रोजच गर्दी होत आहे. परिसरात स्वच्छता 
चांगली आहे. तरीही फेरीवाल्यांना आवर घालण्याची गरज आहे.

टॅक्‍सीचालकांकडून लूट
सीएसएमटी किंवा चर्चगेटवरून गेटवेला येण्यासाठी बेस्ट बस आहेत. मात्र, त्या १० ते १५ मिनिटांनी असल्याने पर्यटक शेअर टॅक्‍सींना पसंती देतात. बरेच पर्यटक महाराष्ट्राबाहेरून येत असल्याने टॅक्‍सीवाले त्यांना चांगलेच लुबाडतात. जादा भाडे आकारणे, टॅक्‍सीत दीडपट ते दुप्पट प्रवासी कोंबणे, रिकाम्या जागेत स्टूल टाकून प्रवासी बसवणे आदी दोन्ही स्थानकांबाहेर सर्रास सुरू असतात. दोन्ही स्थानकांपासून गेट वेच्या वाटेवर चौकाचौकात वाहतूक पोलिस असतात. मात्र, ते अशा प्रकाराकडे कानाडोळा करत असल्यानेच टॅक्‍सीचालकांचे फावते. 

बोटींवर सुरक्षा नाही
गेट वे पाहिल्यावर बरेच प्रवासी लाँचने समुद्रात फेरफटका मारतात; मात्र घारापुरी बेटांवर जाणाऱ्या बोटी असोत वा तिथेच फेरी मारणारी लाँच असो, त्यात सुरक्षेचे नियम पाळले जातात का हा संशोधनाचा विषय आहे. लाँचची तपासणी, क्षमता आणि फिटनेस या गोष्टी तर दूरच्याच. प्रवाशांसाठी मूलभूत सुरक्षा असलेले लाईफ जाकिटही दिले जात नाही. अशा स्थितीत अपघात झाल्यास जीवितहानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे.

स्‍वच्‍छतागृहांची गरज
पर्यटकांसाठी पाणपोयी, खाण्याचे स्टॉल आणि स्वच्छतागृहही आहे; मात्र त्यांची संख्याही वाढण्याची गरज आहे. विशेषतः महिलांचे स्वच्छतागृह वाढवण्याची गरज आहे. सुट्टीच्या दिवशी एकच स्वच्छतागृह अपुरे पडते. गेटवेजवळ हल्ली सुरक्षेच्या कारणास्तव उभारण्यात आलेल्या मेटल डिटेक्‍टरमुळे प्रवाशांची थोडी गैरसोय होते. मेटल डिटेक्‍टरची संख्या वाढली तर पर्यटकांना लांबच लांब रांग लावावी लागणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com