गौराई माझी लाडाची, लाडाची गं...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

 

वाड्यात हेरवाशिणींचा थाटात पाहुणचार; वेल-फुलांच्या हिरव्या गौरींचे पूजन

वाडा : वाडा तालुक्‍यात गुरुवारी (ता. ५) माहेरवाशीण म्हणून आलेल्या लाडक्‍या गौराईचे थाटामाटात व उत्साहात स्वागत करण्यात आले. गणरायापाठोपाठ पाहुणचार, माहेरपणासाठी आलेल्या गौराईच्या स्वागतासाठी महिलांनी जय्यत तयारी केली होती.

वाड्यातील ग्रामीण भागात वेल-फुलांच्या या हिरव्या गौरींना थेट स्वयंपाकघरात चुलीजवळ आकर्षक आरास करून स्थान देण्यात आले आहे. पाटावर चादर अंथरून, त्यावर तांदळाची रास ठेवून लक्ष्मीच्या रूपाने आलेल्या गौरीचे ग्रामीण भागात उत्साहाने स्वागत करण्यात आले. 

वाडा, कुडूस या शहरी भागांत माती, शाडू किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गौरींच्या मूर्ती बसवण्यात आल्या; तर काही ठिकाणी गौरींचे मुखवटे तयार करून त्यांचे पूजन झाले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी मात्र पारंपरिक पद्धतीच्या उत्सवास पसंती दिली.

गौरी म्हणजे माहेराला आलेली माहेरवाशीण या श्रद्धेनुसार ग्रामीण भागात जंगलातील विविध वेली, गौरीच्याच नावाने परिचित असणारे इंदईचे आकर्षक फूल, सिंदीचे फूल, गायगवारीची वेल, गोमेठी वेल, कंटोळीची वेल, कांदवेल आदी जंगलातील वेली दिंडीच्या पानात लेपून हिरवी गौराई घरोघरी आणण्यात आली.

या हिरव्या गौराईला मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, नथ आदी आभूषणे घालून, तिची पूजा करण्यात आली. महिलांनी घरात तांबड्या मातीचे पट्टे ओढून, त्यावर तांदळाच्या पिठाने गौरीची पावले उमटवली. माहेराला आलेली गौरी संपूर्ण घरात आनंदाने भरल्या मनाने फिरते हा यामागील भाव असल्याचे महिलांनी सांगितले. 

रुचकर पातवडचा खास नैवेद्य
गौरीसाठी अळू, भेंडी, माठाची भाजी यांचा नैवेद्य दाखवला जातो. खेडोपाड्यांत अळूचे पान, तांदळाचे पीठ, दही यापासून पातवड नावाचा खास पदार्थ बनवला जातो. अतिशय रुचकर असणारा हा पदार्थ वर्षातून एकदाच लाडक्‍या गौराईसाठीच बनवला जातो. दोन दिवस गौराईचे जागरण केले जाते. आजूबाजूच्या महिला एकत्र जमतात, गौरींची गाणी गातात आणि ठेक्‍यावर ताल धरतात. तिसऱ्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात गौरींचे विसर्जन केले जाते. ज्या शेतात गौरींचे विसर्जन केले जाते, त्या शेतात भरपूर भात येतो, असा भाव शेतकऱ्यांमध्ये असल्याचेही महिलांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gaurai, who arrived as Maheravashin in Wada, was warmly welcomed.