पुढच्या जन्मीही हिजडा व्हायला आवडेल!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

योगी, बाबा व आम्ही!
प्रिया पाटील या तृतीयपंथी असून, तृतीयपंथीयांच्या न्याय्य हक्कांसाठी त्या राज्यभरात काम करीत आहेत. त्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीलाही उभ्या होत्या. एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मला निवडणुकीत जिंकायचे नव्हते, तर लोकांची मानसिकता बदलायची होती. योगी, बाबा घर सोडतात; पण हिजड्याने घर सोडले की लोक नावे ठेवतात, अशी व्यथा त्यांनी मांडली.

पाली - होय, मला पुढच्या जन्मीही हिजडा व्हायला आवडेल... आपण माणूस म्हणून जन्माला येतो; परंतु आपले असणे, दिसणे व प्रकट होणे हे पुरुषसत्ताक पद्धतीच्या हातात असते. तुम्ही माणूस म्हणून जगत असताना तुमच्या अंतरंगातील माणुसकीचे रंग फिके पडू देऊ नका, असे आवाहन तृतीयपंथीय गौरी सावंत यांनी येथे केले.

वडघर (माणगाव) येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या १७ व्या युवा छावणीचे उद्‌घाटन सोमवारी (ता. १) झाले. त्यावेळी गौरी बोलत होत्या. माणसातले माणूसपण जिवंत ठेवणे, त्याचबरोबर सर्वांबरोबर संवेदनशीलतेने वागणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. 

तृतीयपंथीय प्रिया पाटील तसेच गौरी सावंत यांचा जीवन संघर्ष जाणून घेण्याच्या दृष्टीने पत्रकार हीना खान यांनी ही मुलाखत घेतली. लिंगबदल केलेल्या गौरी यांनी एका मुलीला दत्तकही घेतले आहे. या वेळी त्यांनी आपला ‘हिजडा ते आई’ असा प्रवास विशद केला. पुढच्या जन्मीही हिजडा होणे आवडेल, हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. तृतीयपंथीय तसेच लिंगबदल केलेल्या व्यक्तींच्या समस्या सोडविणे, त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याचे काम गौरी करीत आहेत. प्रिया पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. लव्हली या तृतीयपंथीयही व्यासपीठावर उपस्थित होत्या. गौरी सावंत या मुंबईत ‘सखी चारचौघी’ संस्था चालवतात. तर प्रिया पाटील यांनी किन्नरमा ही डॉक्युमेंट्री तयार केली आहे. 

साने गुरुजी स्मारकाचे माजी अध्यक्ष युवराज मोहिते यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या स्मारकाचा इतिहास तसेच आजच्या अस्वस्थ करणाऱ्या जगातील युवकांपुढील आव्हाने विशद केली. या वेळी साने गुरुजी स्मारकाचे कार्याध्यक्ष प्रमोद निगुडकर, माजी कार्याध्यक्ष सुरेश कारले, स्थानिक समिती सदस्य संदेश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद करंदीकर, सरिता आवड, स्मारकाचे व्यवस्थापक सतीश शिर्के उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. विजय दिवाणे यांनी केले. ही छावणी ८ मे पर्यंत सुरू राहील. 

Web Title: gauri sawant story

टॅग्स