जयललितांच्या निधनामुळे मुंबईत महासभा रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - तमिळनाडूत जयललिता यांचे निधन झाल्यामुळे अत्याधुनिक डॉप्लर रडार उभारणीबाबत निर्णय घेणारी महासभा झाली नाही, असे अजब कारण गुरुवारी मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात दिले. यामुळे अवाक्‌ झालेल्या मुख्य न्यायमूर्तींनी नगरसेवक तमिळनाडूला शोक व्यक्त करायला गेले होते का, असा उपरोधिक सवाल पालिकेला केला.

मुंबई - तमिळनाडूत जयललिता यांचे निधन झाल्यामुळे अत्याधुनिक डॉप्लर रडार उभारणीबाबत निर्णय घेणारी महासभा झाली नाही, असे अजब कारण गुरुवारी मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात दिले. यामुळे अवाक्‌ झालेल्या मुख्य न्यायमूर्तींनी नगरसेवक तमिळनाडूला शोक व्यक्त करायला गेले होते का, असा उपरोधिक सवाल पालिकेला केला.

मुंबईतील हवामानाचा वेध घेणारे आणि पावसाचा अंदाज व्यक्त करणारे अद्ययावत डॉप्लर रडार पश्‍चिम उपनगरांत गोरेगावमध्ये उभारण्यात येणार आहे. भारतीय वेधशाळेने याला मंजुरी दिली आहे. मात्र गोरेगावात जागा देण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्‍यक आहे. चार महिन्यांहून अधिक काळ पालिका अधिकारी आणि नगरसेवकांनी हा प्रश्‍न प्रलंबित ठेवला आहे. यामुळे नाराज झालेल्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दोन सुनावण्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. 8 डिसेंबरला महासभा केवळ या निर्णयासाठी होईल, अशी हमी पालिकेच्या वतीने आयुक्त मेहता यांनी न्यायालयात दिली होती. मात्र गुरुवारच्या सुनावणीत ही महासभा झालीच नाही, असे उघड झाले. जयललिता यांचा मृत्यू आणि माजी महापौर रमेश प्रभू यांच्या निधनामुळे महासभा झाली नाही, त्यामुळे अद्याप निर्णय झालेला नाही, मात्र उद्या महासभा होणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने ऍड. एस. यू. कामदार यांनी खंडपीठाला दिली.

यावर खंडपीठाने आश्‍चर्य व्यक्त केले. जयललिता यांचा मृत्यू 5 डिसेंबरला झाला. मग नगरसेवक शोक व्यक्त करण्यासाठी तमिळनाडूला गेले होते का, असा सवाल खंडपीठाने केला.

सध्या कुलाब्यात एक डॉप्लर रडार आहे. मात्र उपनगरांसाठी आणखी एका रडारची आवश्‍यकता आहे. दर पावसाळ्यात मुंबईची होणारी वाताहत टाळण्यासाठी हे आवश्‍यक आहे, अशी मागणी करणारी जनहित याचिका अटल बिहारी दुबे यांनी दाखल केली आहे.

Web Title: General Assembly canceled Jayalalitha death