कल्याण ग्रामीणमध्ये जीवावर उदार होऊन प्रवास 

शर्मिला वाळुंज
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

पावसामुळे कल्याणच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून या परिसरातील नागरिकांसोबतच विद्यार्थीही हैराण झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकवत जाणाऱ्या वाहनातून प्रवास करणे म्हणजे वादळात सापडणाऱ्या बोटीतून प्रवास करण्यासारखेच असल्याचे मत नागरिक मांडतात.

ठाणे : पावसामुळे कल्याणच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून या परिसरातील नागरिकांसोबतच विद्यार्थीही हैराण झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकवत जाणाऱ्या वाहनातून प्रवास करणे म्हणजे वादळात सापडणाऱ्या बोटीतून प्रवास करण्यासारखेच असल्याचे मत नागरिक मांडतात. दर पावसाळ्यात येथील रस्ते खराब होत असून त्याकडे प्रशासन कानाडोळा करते. आता तर प्रशासनाने या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी चक्क राज्य सरकारकडे निधीची मागणी केली असून हा निधी मंजूर होऊन येईपर्यंत जीवावर उदार होतच प्रवाशांना या रस्त्यांवरील खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

अतिवृष्टीने 27 गावांतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मानपाडा रोड, खंबाळपाडा, आजदे गाव, देसलेपाडा, नांदिवली, सागाव, सागर्ली, आईस फॅक्‍टरी, शनी मंदिर रोड, निवासी भाग या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असून त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांना अपघात होण्याची शक्‍यता आहे. यामुळे अनेकांनी पावसाळ्यात दुचाकीऐवजी रिक्षानेच प्रवास करण्याचे ठरविले. परंतु रिक्षाचा प्रवासही अत्यंत खडतर आहे. काही रिक्षाचालक "खड्डेबिड्डे' काही न पाहता सुसाट रिक्षा नेतात, त्या वेळेस एक तर आपण स्वतःतरी किंवा आपले सामान तरी रिक्षातून कधी बाहेर फेकले जाईल, याची शाश्वती नसल्याचे नागरिक सांगतात. 

नागरिकांना, विद्यार्थ्यांना दररोज या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याने प्रत्यक्ष प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर महाविद्यालयीन तरुणी प्रज्ञा माडे म्हणाली, डोंबिवली स्टेशनवरून शेअर रिक्षाने दररोज कॉलेजला जाते. आईस फॅक्‍टरी, सागाव या भागात थोडा तरी जोरात पाऊस झाला तरी पाणी तुंबते. यामुळे रिक्षाचालक तेथे जाण्यास नकार देतात. रसिका गांगल ही तरुणी म्हणाली, हे रस्तेही एवढे खराब आहेत की घट्ट धरून न बसल्यास रिक्षातून बाहेर फेकले जाण्याची भीती आहे. जीविका कुलकर्णी म्हणाल्या, खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकीवरचा तोल जातो, अपघाताच्या घटना दररोज कानावर येतात. त्यामुळे "रिस्कच' नको म्हणून पावसाळ्यात दुचाकी दारात उभी करून ठेवली आहे. 

समाजमाध्यमांवर व्यथा 
दोन तरुणांनी खंबाळपाडा येथील रस्त्यांची दुर्दशा दाखविणारी डॉक्‍युमेंटरी तयार केली असून ती मध्यंतरी खूप गाजली. काही तरुणांनी ट्‌विटरचा आधार घेत रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो व्हायरल करून आपली समस्या मांडली आहे; तर काहींनी खड्ड्यांवरून प्रवास म्हणजे बोटीत बसल्याचे फीलिंग येणारा प्रवास असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून फेसबुकवर शेअर केले आहे. 

आम्हीही माणसेच आहोत. आम्हालाही त्या रस्त्यावरून रिक्षा नेताना प्रचंड त्रास होतो. वेळही खूप जातो; शिवाय परतीचे भाडे मिळण्याची शक्‍यता फार कमी असते. त्यामुळे अनेकदा रिक्षाचालक भाडे नाकारत असतील. रस्तेच मुळात खराब झाल्याने त्यात रिक्षा आदळून नुकसान होते. अनेक कारणांमुळे शेअर रिक्षाव्यतिरिक्त इतर भाडे रिक्षाचालक नाकारत आहेत. 
- सतीश जाधव, 
रिक्षाचालक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Generous travel in Kalyan Rural