
मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने व्यावसायिक नाट्यप्रयोगांसाठी दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या भाड्यात 70 ते 75 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी श्री शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई ः गेले सहा-सात महिने कोरोनामुळे नाट्यगृहे बंद ठेवल्यानंतर नाटकाच्या प्रयोगांसाठी कोरोना सुरक्षा नियमावलीचे पालन करून नाट्यगृहे 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता; परंतु कोरोनाकाळात नाटकांचे प्रयोग बंद असल्यामुळे मराठी नाट्य निर्मात्यांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. यामुळे मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने व्यावसायिक नाट्यप्रयोगांसाठी दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या भाड्यात 70 ते 75 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी श्री शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा - सायन रूग्णालय परिसरात गॅस गळती; सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दादर येथील श्री शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टच्या संचालक मंडळाकडे निवेदन सादर केले. या वेळी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते. "पूर्वीच्या हिमतीने नाट्यप्रयोग लावण्याची शक्ती नाट्यनिर्मात्यांमध्ये आता राहिलेली नाही.
लॉकडाऊनकाळात नाट्यनिर्मात्यांना आपल्या नाटकाचे प्रयोग व नवीन नाट्यनिर्मितीची तयारी थांबवावी लागली आणि त्याचा मोठा फटका नाट्य निर्मात्यांना बसला आहे. तरीही नाट्यनिर्माते नाट्य व्यवसाय नव्याने सुरू करण्याची हिंमत बाळगून आहेत. यासाठी नाट्य निर्मात्यांना सरकारच्या सहकार्याची आणि आर्थिक साह्याची गरज आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहाचे व्यावसायिक नाट्यप्रयोगासाठीच्या भाड्यात 70 ते 75 टक्के सवलत मिळावी, अशी मागणी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाने श्री शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नाट्यकला जोपासणे ही आम्हा नाट्य निर्मात्यांची जबाबदारी आहे. नाट्य व्यवसाय हा आर्थिकदृष्ट्या अतिशय अस्थिर व्यवसाय आहे. जोवर नाटक नाट्यगृहात सादर केले जात नाही तोवर ते नाटक चालणार की नाही, हे कोणालाही सांगता येत नाही. कोरोनामुळे आमचे आर्थिक गणित कोलमडले आहे आणि म्हणून आम्ही हे निवेदन दिले आहे.
- संतोष कोचरेकर,
नाट्यनिर्माते
Get a discount on the rent of Shivaji Natyamandira
----------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )