"जीआयपी' धरणाचा बंधारा फुटला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

अंबरनाथच्या आजूबाजूच्या शहरांना धोका; शेतीचे नुकसान

मुंबई : गेल्या चार ते सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अंबरनाथ तालुक्‍यातील काकोळे गावानजीक असलेल्या रेल्वेच्या जीआयपी धरणाच्या बांधलेल्या बंधाऱ्याची भिंत तुटली. यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्याने आजूबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे.

वालधुनी नदीवर रेल्वेच्या मालकीचे जीआयपी नावाचे ब्रिटिशकालीन जुने धरण आहे. या धरणाच्या संरक्षक भिंतीला तडे जाऊन त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत होता; मात्र रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास बंधाऱ्याची भिंत तुटून पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये जाऊन हजारो एकर जमिनीवरील भात पीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेने अंबरनाथसह उल्हासनगर, कल्याण आदी शहरांना धोका निर्माण झाला आहे.

आमदार, तहसीलदारांकडून पाहणी 
आमदार डॉ. बालाजी किणीकर, तहसीलदार जयराज देशमुख, माजी नगराध्यक्षा पूर्णिमा कबरे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनजितसिंग बग्गा आदींनी रविवारी धरण परिसरात जाऊन पाहणी केली. 

जीआयपी धरणाच्या बंधाऱ्याची भिंत तुटल्याने पाण्याच्या प्रवाहाने शेतीचे नुकसान झाले आहे. धरणाच्या भिंतींना तडे गेले असून रेल्वे प्रशासनाने धरणाच्या संरक्षक भिंतीची त्वरित दुरुस्ती करावी. रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. 
- डॉ. बालाजी किणीकर
, आमदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GIP Dam wall collaps